पत्नीची हत्या; शिक्षक पतीला जन्मठेप, दहा लाखांचा दंड
सोलापूर:व्यावसायाने शिक्षक असलेल्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी शिक्षक पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. आर. औटी यांनी जन्मठेपेची शिक्षा व दहा लाख रुपये दंड ठोठावला आहे. विकास विश्वनाथ हरवाळकर असे शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव आहे, तर अर्चना हरवाळकर असे खून झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे
जुळे सोलापुरातील ‘नीता रेसिडेन्सी’ येथे राहणारा विकास विश्वनाथ हरवाळकर व त्यांची पत्नी अर्चना हरवाळकर हे दोघे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक होते. विकास हरवाळकर हा बांधकाम व्यावसायिक व शेअर मार्केटमध्येसुद्धा काम करीत असे. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. विकास हरवाळकर यांना व्यवसायात नुकसान झाल्याने तो मानसिक तणावात होता. घटनेच्या दिवशी त्यांनी आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सऍपच्या स्टेट्सवर ”फाशीच्या दोरीचे चित्र व Everything is Lost”असे लिहिलेले होते. ही घटना नातेवाईकांना कळताच ते विकासच्या घरी आले; परंतु त्यांनी त्यापूर्वीच पत्नीची हत्या केली होती. घरात लहान मुलगा होता.
माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी विकासला ताब्यात घेतले. या घटनेदरम्यान विकास यानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यात 17 साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय पुरावे, पंचनामा व परिस्थितीजन्य पुरावे यावरून पत्नीची हत्या करणारा आरोपी विकास हरवाळकर याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड सुनावला. तसेच मुलाला 10 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. यात सरकार पक्षातर्फे ऍड. प्रदीपसिंग रजपूत, तर आरोपीच्या वतीने ऍड. पुजारी यांनी काम पाहिले.
पैशाच्या लालसेने कुटुंब उद्ध्वस्त
आरोपी विकास हरवाळकर हा शिक्षकी पेशातला; त्याला पैशाच्या मोहाने वाममार्गाला लावले. बांधकाम व्यवसायाबरोबरच शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने त्याची मानसिक स्थिती ढासळून त्याने पत्नीची हत्या तर केलीच; शिवाय 6 वर्षांच्या मुलाच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरविले. सध्या तो आजीकडे राहत आहे. पैशाच्या मोहाने सधन कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची चर्चा सुरू आहे.