माेहफुलाची दारू विकणाऱ्याला तीन वर्षांचा सश्रम कारावास
गडचिराेली : राहत्या घरी माेहफुलाची दारू बाळगून तिची विक्री करणाऱ्या आराेपीवर गुन्हा सिद्ध झाल्याने चामाेर्शी न्यायालयाने १५ मे राेजी त्याला तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली.
नारायण मुकुंदो मंडल, (४८) रा. विष्णुपूर असे शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. चामाेर्शी तालुक्याच्या विष्णुपूर येथील नारायण मुकुंदो मंडल हा राहत्या घरातून अवैधरित्या माेहफूल दारूविक्रीचा व्यवसाय करीत हाेता. त्याच्या अवैध व्यवसायाबाबत एक दिवस चामाेर्शी पाेलिस स्टेशनला माहिती मिळाली की, त्याने आपल्या घरी अवैधरित्या दारू बाळगली आहे. त्यानुसार चामोर्शी येथील पाेलिस हवालदार राजू उराडे यांनी विष्णुपूर गाठून पंचांसह आरोपीच्या घरी जाऊन त्याच्या घराची झडती घेतली. तेव्हा आरोपीच्या राहते घरी एकूण १०० लिटर मोहफुलाची दारू आढळली. पोलिसांनी पंचनामा कार्यवाही करून आरोपीविरुध्द चामोर्शी पाेलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून तपास केला व प्रकरण चामोर्शी येथील न्यायालयात वर्ग केला. सरकारी पक्षाच्या साक्षपुराव्यावरून आरोपीने अवैधरित्या १०० लिटर दारू बाळगल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी आरोपीस तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. डी. व्ही. दोनाडकर यांनी काम पाहिले.
अवैध विक्रेत्यांना बसेल जरब
दारू विक्रेत्यांवर थातूरमातूर कारवाई करून त्यांना साेडून देण्याचे प्रकार पाेलिस ठाण्यांमधून काही अधिकारी आर्थिक देवाणघेवाणीपाेटी करतात. असे अनेक प्रकार जिल्हाभर सुरू आहेत; परंतु अलिकडे न्यायालयांकडून दारूविक्रेत्यांना शिक्षा ठाेठावून अद्दल घडविली जात असल्याने अवैध विक्रेत्यांना जरब बसेल. परंतु यासाठी दारूविक्रेत्यांविराेधातील प्रकरण न्यायालयात पाेहाेचणे आवश्यक आहे. दारूविक्रेत्यांनाही कारावास हाेताे, ही बाब तेव्हाच जनमानसात पसरेल.