शेतकऱ्याच्या धाडसाने वाचले पाचजणींचे प्राण; संजय माताळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
सिंहगड : गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या व पाण्याचा अंदाज न आल्याने बुडालेल्या सात पैकी चार मुली व एक महिला अशा पाच जणींना एका धाडसी शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले आहे. संजय सिताराम माताळे (वय अंदाजे 60, रा. गोऱ्हे खुर्द ता. हवेली) असे त्या देवदूत बनून आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सावडण्याच्या विधीसाठी आलेल्या संजय सिताराम माताळे यांना अचानक जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. माताळे आवाजाच्या दिशेने पळत गेले असता त्यांना मुली पाण्यात बुडत असलेल्या दिसल्या.
जीवाची पर्वा न करता संजय माताळे यांनी पाण्यात उडी घेतली. तोपर्यंत राजेंद्र जोरी, कालिदास माताळे,शिवाजी माताळे, व रमेश भामे हे स्थानिक किनाऱ्याजवळ मदतीसाठी आले होते. संजय माताळे यांनी पाण्यात बुडून बेशुद्ध झालेल्या चार मुली व एका महिलेला एक-एक करुन पाण्याच्या कडेला आणले.
संजय माताळे हे बुडालेल्या एकेकीला कडेला आणत होते व राजेंद्र जोरी, कालिदास माताळे, शिवाजी माताळे व रमेश भामे हे त्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढत होते. संजय माताळे यांनी धाडसाने पोहत पाचजणींना बाहेर काढले आणि इतरांनी प्रथमोपचार करुन तातडीने उपचारांसाठी खानापूर येथे दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.
दुर्देवाने प्रयत्न करुनही दोन मुली संजय यांच्या हाताला न लागल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संजय माताळे यांना परिसरातील नागरिक व नातेवाईकांचे फोन येत असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
“ओरडण्याचा आवाज आला तसा मी पळालो आणि पाण्यात उडी घेतली. माझ्या मागे काही लोक मदतीसाठी आले होते. पाच जणींना मी बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर काढले व काठावर थांबलेल्यांकडे दिले.
दोघी माझ्या हाताला लागल्या नाहीत. मित्र, नातेवाईक खुप फोन करत आहेत. खुप चांगलं काम केलं असं म्हणत आहेत. डोळे भरुन येत आहेत.” संजय सिताराम माताळे, गोऱ्हे खुर्द, ता. हवेली.