अध्यक्षांकडे अपात्रतेचा साेपविलेला निर्णय हे ठाकरेंसाठी हत्यार : प्रकाश आंबेडकर
अकोला : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सर्वाेच्च न्यायालयाने दिलेला निकाल याेग्यच आहे. सर्वाेच्च न्यायालय आमदारांना अपात्र करूच शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी ताे निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांकडे साेपविला आहे.
न्यायालयाचे हे निर्देश उद्धव ठाकरे यांच्यासाठी हत्यार आहे. ते वापरण्याकरिता उद्धव यांना आक्रमक व्हावे लागेल, अध्यक्षांनी महिनाभरात निर्णय घ्यावा असा अल्टीमेटम देत सर्वच पक्षांना विश्वासात घेऊन थेट विधानसभेला घेराव घालण्याचा पवित्रा घ्यावा, असा सल्ला वंचित बहूजन आघाडीचे संस्थापक ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
अकाेल्यातील विश्रामभवन येथे त्यांनी शुक्रवारी सत्तासंघर्षाच्या निकालावर पत्रकार परिषदेत भाष्य केले. ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर निर्णय याेग्य असल्याचे माझे मत आहे. पक्षाने दिलेला व्हीप अंतिम, गाेगावलेंचे नाव घेऊन त्यांच्या प्रताेदपदी केली नियुक्ती अवैध व १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना हे तीन मुद्दे माझ्यासाठी महत्वाचे आहेत. अध्यक्षांकडे मतदानाची सर्व कागदपत्रे आहेत, न्यायालयाचा निकालही आहे फक्त दाेन्ही बाजू ऐकून घेऊन आता अपात्रेबाबत निर्णय देणे आहे, असे आंबेडकर म्हणाले.
हा निर्णय अवघ्या महिनाभरात अध्यक्षांनी द्यावा असा दबाव आणावा लागेल, हा दबाव हेच उद्धव ठाकरे यांच्यासाठी हत्यार ठरेल, त्यांनी पुढाकार घेत इतर पक्षांसाेबत चर्चा करून अध्यक्षांना अल्टीमेटम द्यावा व त्या मुदतीत अध्यक्षांनी निर्णय न घेतल्यास थेट विधानसभेला घेराव घालावा आणि जनतेच्या न्यायालयात हा मुद्दा प्रभावीपणे नेता येईल असा सल्ला त्यांनी दिला. उद्धव ठाकरे गटाचा हा अंतर्गत प्रश्न असल्याने ते किती आक्रमक भूमिका घेतात यावरच या हत्याराची धार ठरेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमाेद देंडवे आदी उपस्थित हाेते.