ताज्या बातम्या

मराठा सर्वेक्षणात गैरप्रकार बंगल्याच्या जागी झोपडी दाखवली, बागायती जमीन कोरडवाहू केली


मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने केलेले सर्वेक्षण हे अयोग्य पद्धतीने आणि खोटी माहिती नोंदवून करण्यात आल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी केला.



राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) पुन्हा एकदा समाजाची फसवणूक केली जात आहे. राज्य मागासवर्ग आयोग हा मराठा आयोग झाला होता. त्यांच्याकडून मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करण्यात आले. अवघ्या ८ ते १० दिवसांमध्ये १ कोटी ५८ लाख कुटुंबांचे घिसडघाईने सर्वेक्षण करण्यात आल्याची टीका प्रकाश शेंडगे यांनी केली.

प्रकाश शेंडगे यांनी मराठा सर्वेक्षणादरम्यान खोटी माहिती नोंदवून घेतल्याचे म्हटले. जिथे मराठा कुटुंबाचा बंगला असेल किंवा पक्कं घर असेल तिथे झोपडी दाखवण्यात आली आहे. तर बागायती जमीन असलेल्या कुटुंबांच्या नोंदीमध्ये कोरडवाहू जमीन दाखवण्यात आली आहे. नोकरी करत असलेले लोक रोजंदारीवर कामाला जातात, असे दाखवण्यात आले आहे. सर्वेक्षण करणाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या होत्या. या सगळ्या गोष्टी करुन या सर्वेक्षणात चुकीची माहिती नोंदवून घेण्यात आल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला.

आधार कार्डामुळे खोटी माहिती उघड होईल: प्रकाश शेंडगे

मराठा सर्वेक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने चुकीची माहिती नोंदवून घेतली. पण हे करताना एक घोटाळा झाला. या सर्वेक्षणात आधार कार्डाचा नंबर घेण्यात आला आहे. त्यामुळे जी काही खोटी माहिती नोंदवून घेण्यात आली आहे, त्याचा भांडाफोड होईल, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले. मराठा समाजाचं सर्वेक्षण करुन त्यांना मागास ठरवायचे आणि त्यांना आरक्षण द्यायचे, हे षडयंत्र आहे. ९६ कुळी मराठ्यांना मागासवर्गातून आरक्षण मान्य नाही. मराठा समाजामध्येच मागास म्हणून आरक्षण घ्यायचे की नाही, याबाबत वाद आहेत. खुल्या श्रेणीतील मराठा समाजाला मागासवर्गीय श्रेणीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. पण आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आहे. त्यामुळे मराठा समाजाचे स्वतंत्र आरक्षण टिकणार नाही. मग मागासवर्गात गेलेल्या मराठा समाजाचे काय होणार, असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी विचारला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button