कुरुलकरनंतर गुप्तचर अधिकारी रडारवर
मुंबई : पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणा पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या (पीआयओ) हस्तकाला गुप्त माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकरच्या अटकेनंतर एक गुप्तचर अधिकारी राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) ‘रडार’वर आला आहे.
डॉ. कुरुलकरच्या फोन कॉलच्या यादीत या गुप्तचर अधिकाऱ्याचे नाव पुढे आले. त्यानुसार ‘एटीएस’ने संबंधित गुप्तचर अधिकाऱ्याचा मोबाईलही जप्त केला असून, अधिक तपास करण्यात येत आहे.
‘एटीएस’ने ३ मे रोजी याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून डॉ. कुरुलकरला अटक केली. ‘एटीएस’चे पुणे येथील पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. ‘एटीएस’ने डॉ कुरुलकरकडून ताब्यात घेतलेला मोबाईल, लॅपटॉप आणि अन्य दस्तावेजाच्या आधारे तपास करत कसून चौकशी सुरू ठेवली आहे. डॉ. कुरुलकरच्या मोबाईलच्या तपासणीत एका अधिकाऱ्याबाबत ‘एटीएस’ला माहिती मिळाली. त्यानेही पाकिस्तानला गुप्त माहिती पुरविल्याचा ‘एटीएस’ला संशय आहे. डॉ. कुरुलकरला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आले होते. झारा दास गुप्ता या बनावट पाकिस्तानी अकाऊंटवरून एका तरुणीचा त्याच्यासोबत संवाद झाला होता.
फेब्रुवारी महिन्यापासून ‘डीआरडीओ’च्या दक्षता विभागासोबतच गुप्तचर पथकांकडून डॉ. कुरुलकरवर नजर ठेवली जात होती. याबाबतची संपूर्ण माहिती पुराव्यानिशी मिळाल्यानंतर आणि ‘डीआरडीओ’ मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर ‘एटीएस’ने गुन्हा दाखल करून कुरुलकरला अटक केली.