खोलीत उग्र वास, गडद अंधार अन् वर्षभर तिथेच बंद राहिल्या 2 बहिणी; अवस्था पाहून पोलीसही हादरले
पानीपत: आई-वडिलांचा मृत्यू झाला होता आणि मुली वर्षभरापासून घरात बंद होत्या. हे प्रकरण हरियाणाच्या पानिपत शहरातील काइस्तान मोहल्लाशी संबंधित आहे. येथे गेल्या 1 वर्षांपासून दोन बहिणींनी स्वतःला घरात कोंडून घेतल्याची घटना समोर आली आहे दोन्ही बहिणी घरात कुलूपबंद असल्याचं पाहून शेजाऱ्यांनी बुधवारी पोलीस नियंत्रण कक्षाच्या डायल 112 या क्रमांकावर याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिला पोलिसही त्यांच्यासोबत होत्या. पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक शेजारी यांच्या मदतीने मुलींना दरवाजा उघडायला लावण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
मात्र त्या गेट उघडत नव्हत्या. खिडकीतून उग्र वास येत होता. एवढंच नाही तर खोलीतही अंधार होता. शेजारची कमला हिने सांगितलं की, ती याच परिसरातील रहिवासी आहे. ती या दोन्ही मुलींची मावशी लागते. तिने सांगितलं की, या मुलींचे वडील दुलीचंद यांचं सुमारे 10 वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झालं, तर आई शकुंतला यांचं 5 वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर दोन्ही मुली खासगी कंपनीत कामाला होत्या, मात्र गेल्या एक वर्षापासून त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं.
मोठी मुलगी सोनिया 35 वर्षांची आहे, तर धाकटी मुलगी चांदनी 34 वर्षांची आहे. पोलिसांच्या मदतीने दोन्ही मुलींची सुटका करण्यात आली, त्यात सामाजिक संस्था तसंच जनसेवा दलाचे सामाजिक कार्यकर्ते चमन गुलाटीही होते. सर्वजण खिडक्या तोडून खोल्यांमध्ये शिरले. या मुलींना सध्या पानिपत येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं असून, त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. प्रचंड नैराश्यामुळे मुलींना नीट बोलताही येत नाही. याच कारणास्तव दोघीही वर्षभर घराबाहेर पडले नसल्याचे म्हटलं जात आहे.