हत्यार बाळगणाऱ्या चौकडीला सश्रम कारावास
कल्याण : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ विविध प्रकारची हत्यारे बाळगणाऱ्या शत्रुघ्न काळूराम मढवी (४७, रा.सापर्डे, कल्याण), सूरकान रफिक कुट्टी (३३, रा. मिलिंद नगर), मंगेश सांडू पाटील (५०, रा. चिकनघर) आणि निलेश पंडित शेलार (३५, रा. मानिवली गाव) या चौकडीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. सी. गोरवाडे यांनी तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
पश्चिमेतील खडकपाडा ते बेतूरकरपाडा रोडवर ऑक्टोबर २०१० मध्ये एका चारचाकीमधून आलेल्या या सर्वांनी स्वतःजवळ घातक शस्त्रे बाळगली होती. सकाळच्या सुमारास कल्याणमध्ये भाजी घेण्यासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना अडवून त्यांच्याकडील किमती ऐवज लुटण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र, त्या आधीच महात्मा फुले चौक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या चौकडीविरोधात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक आर. एम. आव्हाड यांनी कल्याण न्यायालयात आरोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी पोलीस हवालदार आर. डी. आटपाडकर, दीपक पिंगट व महिला पोलीस नाईक जे. डी. झोळेकर यांनी त्यांना मदत केली.