ना पेट्रोलची चिंता, ना डिझेलचा खर्च, या हायवेवर विना इंधन धावतील गाड्या
नवी दिल्ली: देशात आता केंद्र सरकार इलेक्ट्रिक हायवे तयार करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्यावर्षी एका बैठकीत याविषयीची घोषणा केली होती.दिल्ली ते मुंबई, देशाची राजधानी ते आर्थिक राजधानी या दरम्यान हा हायवे करण्यात येणार आहे. ट्रॉलीबस प्रमाणेच या द्रुतगती महामार्गावरुन ट्रॉली ट्रक चालविण्यात येणार आहे.
असे करेल काम
या इलेक्ट्रिक हायवेवर चारचाकी वाहनं सुसाट धावतील, ते ही पेट्रोल आणि डिझेल शिवाय. इलेक्ट्रिक हायवेवर ओव्हरहेड वायर्स असतील त्यामुळे वाहनांना इलेक्ट्रिकचा पुरवठा होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी नवीन मुंबई-नवी दिल्ली हायवे तयार करण्याची घोषणा केली आहे. या हायवेवर चार पदरी इलेक्ट्रिक वाहतूक करता येईल. त्यासंबंधीची सुविधा देण्यात येत आहे.
काय आहे इलेक्ट्रिक हायवेचा अर्थ?
इलेक्ट्रिक हायवेवर वाहनांना जमीन अथवा वरच्या बाजूला असलेल्या विजेच्या तारांनी विजेचा पुरवठा करण्यात येतो. या वाहनांना चार्जिंग स्टेशनवर थांबून चार्जिंग करण्याची गरज नाही. रेल्वेच्या रुळावर वरील बाजूस विजेच्या तारा असतात त्याआधारे ट्रेनच्या वरच्या बाजूने असलेल्या पेंटाग्राफच्या सहायाने वीज इंजिना पर्यंत जाते. तिथे तिचे ऊर्जेत रुपांतर होते. त्याचपद्धतीने हा इलेक्ट्रिक हायवेवर विजेचा पुरवठा करण्यात येईल.
असा होईल फायदा
इलेक्ट्रिक हायवे तयार झाल्याने मालवाहतूक अधिक स्वस्त होण्याची शक्यता आहे. याशिवाय चार्जिंगच्या झंझटीपासून वाहनधारकांची सूटका होईल. वाहनांना कुठे ही जास्त काळ थांबण्याची गरज भासणार नाही. पेट्रोल-डिझेलचा वापर एकदम शुन्यावर येईल. केंद्र सरकार यासाठी आणखी एक योजना आखत आहे. हायवे शेजारीच सौरऊर्जा प्रकल्प उभारुन कोणत्याही अडथळ्याशिवाय विजेचा पुरवठा करण्याची योजना आहे.
ई-हायवेवर एक लूक
मुंबई-दिल्लीला जोडणाऱ्या या हायवेवर इलेक्ट्रिक वाहनांना विजेचा पुरवठा करण्यात येईल
ही ऊर्जा अक्षय ऊर्जा प्रकल्पाचा वापर करुन तयार करण्यात येईल
जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये जगातील सर्वात लांब ई-हायवे आहे
त्याची लांबी जवळपास 109 किलोमीटर आहे
स्वीडन या देशात पण ई-हायवे तयार करण्यात आलेला आहे
भारतात हा प्रकल्प यशस्वी झाल्यास हा जगातील सर्वात लांब ई-हायवे ठरेल