किरकोळ वादातून सख्या भावाची हत्या

नाशिक: नाशिक शहरात किरकोळ वादातून हत्या झाल्याची घटना सिडको परिसरातील कामटवाडे येथे घडली आहे. कामटवाडे येथे सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यावर लाकडी दंडुका मारून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.गुरुवारी रात्री किरकोळ भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडुका मारून खून केला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी (Ambad Police) संशयित आरोपी हरी दामू निकम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
कामटवाडा येथे मयत सदाशिव दामू निकम आणि आरोपी त्याचा भाऊ हरी दामू निकम हे शेजारी राहतात. गुरुवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास सदाशिव दामू निकम हे घरासमोर रस्त्यावर बोलत होते. यावेळी संशयित त्याचा भाऊ हरी दामू निकम हा सदाशिव जवळ आला आणि मला शिवीगाळ का करतो, यावरून वाद झाल्यानंतर त्याने सदाशिव याच्या डोक्यात लाकडी दांडुका डोक्यात मारला. यात सदाशिव हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना सदाशिव यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले.
नाशिक शहरात सध्या सर्रास दिवसाढवळ्या, चाकू, कोयत्याने वार केल्याच्या, प्राणघातक हल्ल्याच्या घटना भरवस्तीत घडत आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये दशहत पसरली आहे. यामुळे शहरातील नागरिक देखील जीव मुठीत घेऊन शहरात वावरत आहे.