तोतया तृतीयपंथीला निर्वस्त्र करून चोपले! सागर पार्क परिसरातील प्रकार
जळगांव:साडी-चोळी नेसून साजश्रृंगार करत ख-या तृतीयपंथीयांसारखे हातवारे करून नागरिकांच्या घरात शिरून जबरीने पैशांची मागणी करणा-या तोतया तृतीयपंथीला ख-या तृतीयपंथींनी निर्वस्त्र करून धुलाई केल्याची घटना शनिवारी सकाळी आडेआठ वाजेच्या सुमारास सागरपार्क परिसरामध्ये घडली.
यावेळी नागरिकांचा प्रचंड समुदाय या परिसरामध्ये गोळा झाला होता. धुलाई केल्यानंतर तोतयाला सोडून देण्यात आले.
सागरपार्क परिसरामध्ये तीन तोतया तृतीयपंथीयांच्या वेशभूषेत नागरिकांच्या घरात शिरून पैशांची मागणी करीत होते. त्यांचा त्रास जाणवल्यानंतर तेथील नागरिकांनी ख-या तृतीयपंथींना त्याची माहिती दिली. काही वेळात ख-या तृतीयपंथीयांनी सागर पार्क परिसर गाठले. त्यांनी तिघा तोतयांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण, दोन जण पसार झाले तर एक त्यांच्या हाती लागला. त्यांनी त्याला नागरिकांना का त्रास देता आहेत असे म्हणत निर्वस्त्र करून चांगलीच धुलाई केली. या प्रकारामुळे बघ्यांची प्रचंड गर्दी रस्त्यावर झाली होती. त्या तोतयाला तृतीयपंथींनी चोप दिल्यानंतर सोडून दिले.
तोतयांचा वाढता होता त्रास…
गेल्या सात ते आठ दिवसांपूर्वी या तोतया तृतीयपंथींनी कुसूंबा येथील एका महिलेच्या थेट घरामध्ये शिरून पैशांची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी जबरीने सतराशे काढून घेतले होते. तर समता नगरामध्ये देखील वृध्द महिलेला पैशांसाठी त्रास दिला होता. तसेच शिवकॉलनीमध्ये सुध्दा थेट घरामध्ये शिरून पैसे मागितले होते. हा प्रकार ख-या तृतीयपंथीयांना माहिती झाल्यानंतर त्यांनी त्यांना समज दिली होती. मात्र, त्यानंतरही त्यांनी तोच प्रकार केल्यामुळे अखेर शनिवारी तोतयाची धुलाई करण्यात आली.