उन्हाळ्यात पावसाळा अन् थंडीही, वीज पडून ६ ठार; गारपिटीने पिके झोपली
मुंबई: एकीकडे कडक उन्हाळा, तर दुसरीकडे विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि गारांचा वर्षाव होत असल्याचे चित्र खान्देश, मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात शुक्रवारी पाहायला मिळाले.वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला असून, जनावरेही दगावली आहेत. उभी पिके झोपली असून, नुकसान असह्य झाल्याने धाराशिव जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.
खान्देशात गेले तीन दिवस गारांचा मारा होत असून, शुक्रवारी वीज पडून जनावरे दगावली. जळगाव, धुळे जिल्ह्यात १० शेळ्या २ बैलांचा मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला.
चौघांचा मृत्यू
nबीड जिल्ह्यात गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दुपारी ठिकठिकाणी पाऊस झाला. केज तालुक्यातील केळगाव येथील बिभीषण अण्णासाहेब घुले (वय ५०) या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. काळेगाव घाट शिवारातील एक बैल ठार, दुसरा बैल भाजल्याची घटना घडली आहे.
nधाराशिव जिल्ह्यात दोन दिवसांत विजांच्या तांडवात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर ८ जनावरे दगावली. १ हजार १० कोबड्यांनीही जीव सोडला. दिग्रस (जि.यवतमाळ) तालुक्यातील हरसूल शिवारात अंगावर वीज पडून किशोर तुळशीराम रिंगणे (वय ४०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
मराठवाड्यात अतिवृष्टी
छत्रपती संभाजीनगर शहरात अवघ्या अर्ध्या तासात २१ मिमी पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली. एमजीएम गांधेली वेधशाळेत वाऱ्याचा वेग ताशी ८० किलोमीटर एवढा नोंदविला गेला. पुढील ६ मेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशाच जोरदार पावसाची शक्यता औंधकर यांनी वर्तविली.
लातूर जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३९.५ मिमी पाऊस झाला आहे. पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. गेल्या तीन दिवसांमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झाला असून, २९ जनावरांसह २० कोंबड्या दगावल्या आहेत.
अवकाळीचा फटका; शेतकऱ्याची आत्महत्या
तुळजापूर (जि.धाराशिव) : अवकाळी पावसामुळे द्राक्षबागेचे
नुकसान झाले. त्यामुळे बँकेचे घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेतून माेर्डा येथील सूरज सुरवसे या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.