महाराष्ट्रात वळवाचा धुडगूस, गारपिटीचा इशारा; बळीराजा चिंतातूर
मुंबई: मुंबईसह राज्यभरात वळवाच्या पावसाचे संकट कायम आहे. शुक्रवारी विदर्भाला गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात अवकाळी पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबईलाही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवारी नांदेड, हिंगोली, लातूर, जळगाव जिल्ह्यातील काही भागांत वादळवाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. पश्चिम वऱ्हाडातही गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यातील बेडी (ता. नशिराबाद) परिसरात गारपिटीसह चक्रीवादळामुळे सुमारे २०० घरांची पडझड झाली. या घटनेत तिघे जखमी झाले. भुसावळ शहरासह तालुक्यातील साकेगाव येथे जोरदार वाऱ्यासह वळवाच्या पावसाने दहा मिनिटे अक्षरश: धुमाकूळ घातला. साकेगाव, ता. भुसावळ येथे जि. प. शाळेची पत्रे उडाली.
लिंबू मातीमोल, कांदा सडला
nअकोला : अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात गुरुवारी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, गारपिटीसह आलेल्या पावसाने हजारो हेक्टरवरील रब्बी, उन्हाळी पिकांसह, भाजीपाला, फळपिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. पातूर तालुक्यात लिंबाच्या आकाराचा गारांचा पाऊस झाला. वाशिम तालुक्यातील कोंढाळा (झामरे) येथील ज्ञानेश्वर इंगोले (२८) या युवकाचा गुरुवारी अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
nबुलढाणा जिल्ह्यात जवळपास ९०० हेक्टरच्यावर पिकांचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव (ता. बाळापूर) परिसरातील शेतात पाणीच पाणी साचले असून, कांद्याचे पीक सडले आहे. लिंबू पिकाचेही प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
पशुधन वाचविण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यू
कळंब (जि. धाराशिव) : वातावरणात टपोरं चांदणं, यामुळे पशुधन गोठ्याच्या बाहेर बांधून ते घरी पोहोचले. इतक्यात अवकाळीचे वारे शिवारात शिरले. जिवापाड जपलेल्या पशुधनास सुरक्षित गोठ्यात बांधावे यासाठी ‘त्याने’ परत शेत गाठले. मात्र, नियतीने घात केला. अचानक विजेचा कडकडाट झाला, लगत कुठेतरी वीज कोसळली. यातून निर्माण झालेल्या भयकंपाने ३५ वर्षांच्या तरुणाचा बळी घेतला. ही घटना कळंब तालुक्यातील हिंगणगाव येथे बुधवारी रात्री उशिरा घडली. गोविंद अजित अभंग असे या मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही झोडपले
नांदेड : हिंगोली शहरासह जिल्ह्यातील बहुतांश गावांत गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. कळमनुरी, वरूड, जवळाबाजार, वाकोडी, रामेश्वरतांडा, डिग्रस कऱ्हाळे, कनेरगाव नाका, सवना, कडोळी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे हळद वाळविण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
निलंगा (जि. लातूर) शहरासह तालुक्यात गुरुवारी वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. मुबारकपूर तांडा येथील एक ११ वर्षीय मुलगी आरुषा नथुराम राठोड व तगरखेडा येथील शेतकरी राजप्पा व्यंकट कल्याणे (५०) यांचा मृत्यू झाला. शिवाय सहा जनावरेही दगावली.
nनांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातील जांब, दापका राजा, हिप्परगाव, सावरगाव या भागात गारपीट झाली. मुदखेड तालुक्यातील बारड, माहूर तालुक्यातील वाई बाजार, उमरी तालुक्यातील हुंडा, मांझरम, राहेर, फुलवळ या भागाला गारपिटीने झोडपले. गारपिटीमुळे केळी, मोसंबी, पपईच्या बागांचे नुकसान झाले