शिरुर तालुक्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा कुजलेला मृतदेह
शिरूर:करंदी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी येथे चासकमान कालव्याच्या कडेला एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी चासकमान कालव्याचे जवळ विनायक सातपुते हे जनावरे चारण्यासाठी घेऊन गेले असताना त्यांना सदर ठिकाणी एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला याबाबतची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रेवणनाथ मुत्तनवार, प्रतिक जगताप, करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, वाजेवाडीच्या पोलीस पाटील सोनाली वाजे, सामाजिक कार्यकर्ते कचरू वाजे, कोंडीबा साबळे, राघू नप्ते, विशाल नप्ते, विनायक सातपुते, दादा सातपुते, सर्जेराव वाघमारे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह त्याच्या अंगावर निळसर रंगाची प्यांट व पांढऱ्या रंगाचा मळलेला शर्ट असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत विनायक दशरथ सातपुते (वय ४3) रा. मांजरेवाडी करंदी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली, तर घटनास्थळी केंदूर प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी माया पवार यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करत मृतदेहाचे दफन केले, तर सदर व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ९४०५५८७००२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार हे करत आहे.