कैद्याच्या चप्पलमध्ये मोबाईल हॅण्डसेट
कोल्हापूर : न्यायालयातून कळंबा मध्यवर्ती कारागृहात जाताना आज कैद्याने चप्पलमधून दोन मोबाईल हॅण्डसेट लपवून नेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकाने त्याला पकडून त्याच्याकडून अकराशे रुपयांचा निळ्या रंगाचा आणि अकराशे रुपयांचा काळ्या रंगाचा असे दोन मोबाईल हॅण्डसेट आणि त्यांच्या बॅटऱ्या जप्त केल्या.
कैदी संशयित आरोपी प्रदीप विश्वनाथ जगताप व अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. याची फिर्याद तुरुंग रक्षक महेश देवकाते यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.
संशयित आरोपी कैदी प्रदीप जगताप याला आज जयसिंगपूर येथील न्यायालयातून कळंबा मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. यावेळी त्याच्यासोबत पोलिस मुख्यालयातील पोलिस व्ही. एम. कुरणे, एस. बी. सरगर होते. त्यांनी जगतापला हजर केल्यानंतर कारागृहातील सुरक्षारक्षक देवकाते यांनी त्याची अंगझडती घेतली. मेटल डिटेक्टद्वारे त्याला कारागृहात घेताना त्याच्या डाव्या व उजव्या पायातील चप्पलमध्ये आवाज झाला.
त्यामुळे त्याचे दोन्ही चप्पल काढून घेत तपासणी करताना चप्पलमध्ये टाचेकडील बाजूला मोबाईल बसेल इतकी जागा पोखरून त्यामध्ये हॅण्डसेट ठेवल्याचे दिसले. त्यामुळे दुसऱ्या चप्पलमध्ये अशाच पद्धतीने मोबाइल हॅण्डसेट, बॅटरी मिळाली. मात्र त्यामध्ये सीमकार्ड नसल्याचे दिसले. एका चप्पलमध्ये काळ्या, तर दुसऱ्या चप्पल मध्ये निळ्या रंगाचा मोबाइल हॅण्डसेट मिळाला.
कारागृहात मोबाइल हॅण्डसेट आणि बॅटरी घेवून येवून कळंबा कारागृहाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्यामुळे संशयित आरोपी कैदी प्रदीप जगताप आणि हॅण्डसेट देणारा अज्ञात त्यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तुरुंग रक्षक देवकाते यांनी फिर्यादी दिली. त्यानुसार कारागृह कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.
आठवड्यात तीन घटना
तुरुंग रक्षकाच्या प्रसंगावधानाने आज कळंबा मध्यवर्ती कारागृहात दोन मोबाइल हॅण्डसेट जप्त केले. गेल्या आठवड्यात कारागृहाची सुरक्षा ऐरणीवर अल्याचे दिसले आहे. शेतात गांजा आणि मोबाईल हॅण्डसेट मिळाल्यानंतर पुन्हा काल झालेल्या कारागृराच्या झडतीत बरॅकमध्येच मोबाईल हॅण्डसेट मिळाले होते.