मोबाईल चोरट्यांवर भाषेच्या कौशल्याची मात
पुणे: वेगवेगळ्या राज्यांमध्ये चोरीच्या माध्यमातून गेलेले मोबाईल पोलिसांनी आपले बहुभाषेचे कौशल्य वापरून परत मिळविले आहेत आणि संबंधित मोबाईलमालकांच्या ते ताब्यातही देण्यात आले आहेत. हरविलेले महागडे मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यात शिवाजीनगर सायबर पोलिसांना यश आले आहे. त्यांनी हरवलेले 9 लाखांचे 51 मोबाईल हस्तगत केले. संबंधित तक्रारदारांना ते परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलिस अंमलदार रूपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार केला होता.
विविध भाषांमध्ये साधला संवाद
पोलिसांनी हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार केला होता. तांत्रिक तपास करून पाठपुरावा करून हरवलेले मोबाईल गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, बिहार, पंजाबमध्ये वापरात असल्याचे निदर्शनास आले. पोलिस अंमलदार आदेश चलवादी यांच्याकडे असलेल्या बहुभाषक कौशल्याचा (कन्नड, तेलगु, हिंदी, इंग्रजी व मराठी) वापर त्यांनी केला. त्यांनी विविध भाषांमध्ये संवाद साधून हरवलेले 10 लाख रुपयांचे 51 मोबाईल हस्तगत केले. त्यानंतर तक्रारदारांना फोन परत करण्यात आले.
हॉटेल टल्लीवर कारवाई
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत रात्री दहानंतरही मोठ्या आवाजात साउंड सिस्टीमद्वारे संगीत वाजविणाऱ्या हॉटेल टल्ली रेस्टॉरंट बारविरुद्ध सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. हॉटेलमधील 4 लाख 80 हजारांचे साउंड मिक्सर जप्त केले आहेत. कोरेगाव पार्क परिसरात गल्ली क्रमांक सातमध्ये टल्ली रेस्टॉरंट अॅण्ड बारमध्ये मोठ्या आवाजात साउंड सिस्टिमचा आवाज येत असल्याचे पथकाला आढळले.
त्यानुसार पथकाने हॉटेलवर कारवाई करून 4 लाख 80 हजारांची साउंड सिस्टीम जप्त केली. हॉटेलचे मालक व मॅनेजर विरुध्द पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत ध्वनिप्रदुषण अन्वये कारवाई केली. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, अजय राणे, इरफान पठान, अमित जमदाडे यांनी केली.