ऑस्ट्रेलियात पाकिस्तानी लोकांकडून ‘मोदी है तो मुमकिन है’चा नारा, भारताच्या पंतप्रधानांचं कौतुक करत म्हणाले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातल्या सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. मोदींची भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये लोकप्रियता वाढत आहे. आता पाकिस्तानी नागरिकांमध्येही मोदी लोकप्रिय होऊ लागल्याचं पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानमधील मुस्लिमांचे अनेक समुदाय आहेत जे मोदींची स्तुती करतात. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एनआयडी फाऊंडेशनने नुकताच ‘विश्व सद्भावना कार्यक्रम’ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आलेल्या पाकिस्तानी लोकांनी ‘मोदी है तो मुमकिन है.’चा नारा दिला.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियात भारतीय अल्पसंख्याक फाऊंडेशन (आयएमएफ), एनआयडी फाऊंडेशन (दिल्ली) आणि नामधारी शीख सोसायटीने २३ एप्रिल रोजी विश्व सद्भावना कार्यक्रमाचं (Vishwa Sadbhawana event) आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला जगभरातील धार्मिक नेते, विचारवंत, अभ्यासक, धर्म प्रचारक आणि संशोधक सहभागी झाले होते. तसेच विविध धार्मिक समुदायातील पाकिस्तानी लोकही या कार्यक्रमाला आले होते. त्यातील बहुतांश लोक अहमदिया मुस्लिम समाजाचे होते.
या कार्यक्रमात अहमदिया समुदायातील मुस्लीम लोकांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, मोदी सर्व समुदायांचा सन्मान करतात, ही गोष्ट आम्हाला आवडली आहे. सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्यची क्षमता त्यांच्याकडे आहे. म्हणूनच आम्ही त्यांचं कौतुक करतो.
मूळचे लाहोरचे असलेले अहमदिया मुस्लीम समुदायातील एक सदस्य डॉ. तारिक बट यावेळी म्हणाले की, “माझे अनेक भारतीय मित्र आहेत. मी त्यांना एकत्र येऊन वेगवेगळे उपक्रम राबवताना पाहतो. मी स्वतःही अनेकदा त्यांच्या कार्यक्रमांना गेलो आहे. मला असं वाटतंय की भारतीय मुस्लीम आणि पाकिस्तानी मुस्लिमांमधील एकोपा वाढत आहे. आम्हाला त्यांच्यातील आणि आमच्यातील फरकापेक्षा अधिक समानता आणायची आहे.”
“मोदी है तो मुमकिन है”
तारिक बट म्हणाले की, हिंदू असो वा मुस्लीम सर्व समुदायांमध्ये एकोपा आणि शांतता वाढवण्यासाठी, समुदायांना एकत्र आण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम पंतप्रधान मोदी उत्कृष्टपणे करत आहेत. पंतप्रधान मोदींकडे असा करिष्मा आहे ज्यामुळे लोक त्यांच्या धार्मिक विचारांची, त्यांच्या धार्मिकतेची पर्वा न करता मोदींचं अनुसरण करत आहेत. हे खूप चांगलं आहे. मोदींचं कौतुक करण्यासाठी मी म्हणेन, मोदी है ते मुमकिन हैं.