ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

रिफायनरी विरोधी संघटनेच्या मुंबई अध्यक्षांना अटक


मुंबई: बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण करण्याच्या हालचाली सुरू असतानाच पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.
रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना काल, सोमवारी (२४ एप्रिल) राजापूरमध्ये अटक केली. त्यांच्यासोबत अन्य दोन सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या तिघांनाही सध्या रत्नागिरीत ठेवण्यात आले आहे.

राजापुरातील रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज दिल्यानंतरही स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे. दरम्यान, सोमवारी काही नागरिकांना घरी पाठवण्यात आले. मात्र, ज्या ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे, ती जागा मात्र आंदोकांनी सोडली नाही. काहींना घरी पाठवल्यानंतर आंदोलकांच्या एका गटाने आंदोलनस्थळी रात्रभर पहारा दिला.

राजापूर तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी सोमवारी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. बारसू परिसरात पोलिसांनी जवळपास दोन हजारांचा फौजफाटा तैनात केला आहे. त्यामुळे सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.

रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या आणि जनतेला सोशल मीडियाद्वारे भडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांची धरपकड सुरू केली आहे. रिफायनरी विरोधी नेते सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांना रत्नागिरी पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. आता वैभव कोळवणकर यांच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button