सांगली जिल्ह्यात पुन्हा दुहेरी हत्याकांड, जत तालुक्यात माय लेकीचा गळा आवळून खून

सांगली: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी पोलीस स्टेशन हद्दीमधील कुणीकुणुर गावामध्ये मायलेकीचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला आहे.
प्रियंका बेळूखे (वय 32 वर्षे) आणि त्यांची मुलगी मोहिनी बेळूखे (वय 14 वर्षे) असे मृत मायलेकीचे नाव आहे. मायलेकीची कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. उमदी पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी पती बिरप्पाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. अन्य तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहेत.
अधिक तपास उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार करत आहेत. घटनास्थळी आज (24 एप्रिल) सकाळी प्रियांका आणि मोहिनीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर उमदी पोलिसांनी तातडीने दाखल होऊन पंचनामा करुन तपास सुरु केला आहे. मायलेकीचा कापडाने गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, कोणत्या कारणातून ही हत्या झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात खुनाच्या सलग घटना घडल्या आहेत. सांगलीत महिनाभरात पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांड घडले आहे. गेल्या महिन्यात सांगलीमधील कोसारीत दुहेरी हत्याकांड घडले होते. जत तालुक्यामध्येच माजी भाजप नगरसेवकाची सुद्धा निर्घृण हत्या करण्यात आली होती.
भर रस्त्यात पाठलाग करुन सराईत गुन्हेगाराची हत्या
दरम्यान, आठवडाभरापूर्वी भर रस्त्यात पाठलाग करुन खून करण्याची घटना कुपवाडजवळच्या बामणोलीत घडली होती. अमर उर्फ गुट्ट्या जाधव असं मृत गुन्हेगाराचं नाव आहे. मृत अमर जाधव हा आपल्या दुचाकीवरुन कुपवाडनजीक असणाऱ्या बामणोली येथील आपल्या घरी निघाला होता. दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. तत्पूर्वी, 13 एप्रिल रोजी सांगली शहरामध्येच सिनेस्टाईल पाठलाग करत महाविद्यालयीन तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. केवळ एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणातून एका तरुणाचा तीन तरुणांनी खून केला. माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ही खळबळजनक घटना घडली होती. राजवर्धन राम पाटील (वय 18 वर्षे) असे या मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो वसंतदादा औद्योगिक परिसरातील शासकीय आयटीआयमध्ये शिकत होता. याच घटनेपूर्वी, वानलेसवाडी येथे एक गुंठ्यांच्या जागेवरुन महिलेचा निर्घृण खून करण्यात आला होता.