ईदगाह मैदानावर नमाजपठण; पोलिस बंदोबस्त चोख
येथील ईदगाह मैदानावर शनिवारी (ता. २२) सकाळी दहाला ‘ईद-उल-फित्र’चे नमाजपठण होणार आहे. यात सुमारे २५ हजार मुस्लीम बांधव देशात शांतता व सुख-समृद्धी लाभावी, यासाठी प्रार्थना करतील.
शहर पोलिसांनी ईदगाह मैदानाची पाहणी करीत आढावा घेतला. दरम्यान, रमजाननिमित्त चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ईदगाह मैदानावर रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्तासाठी सात पोलिस निरीक्षक, १४ सहाय्यक पोलिस निरीक्षक, १६० पोलिस कर्मचारी, १४ महिला पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे १३० जवान, शीघ्र कृती दल आणि राज्य राखीव दलाची प्रत्येकी एक-एक तुकडी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे.
परिमंडळ दोनमध्ये ठिकठिकाणी होणाऱ्या सामुहिक नमाजपठणासाठीही एक पोलिस निरीक्षक, ५० कर्मचारी, दहा महिला कर्मचारी, गृहरक्षक दलाचे १७० जवान आणि शीघ्र कृती दल व राज्य राखीव दलाच्या प्रत्येकी एक-एक तुकडीचा बंदोबस्त असणार आहे.
नमाजपठणानंतर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांकडून ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केले जाणार आहे.
विशेषत: ईदगाह मैदानावर मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने या मार्गावरील वाहतूक शरणपूर रोडमार्गे तरणतलाव सिग्नलकडे वळविण्यात येईल तर गडकरी सिग्नलकडून येणारी वाहतूक चांडक सर्कल मार्गे शरणपूररोड, त्र्यंबकरोडकडे वळविली जाईल. बंदोबस्तावर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी यांचे बारकाईने लक्ष आहे.
सुट्ट्या रद्द
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्यांसह रजा रद्द करण्यात आलेल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्तालयातर्फे सदरील आदेश देण्यात आलेले आहेत.