66 गायी-वासरांचा तडफडून मृत्यू; घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ
बीड: राज्यात गोहत्या बंदी असतानाही गोवंशाच्या कत्तली थांबायचा नाव घेताना दिसत नाही. अतीशय अमानवीय पद्धतीने या गोवंशाची वाहतूक करण्यात येत आहे. अशाच एका घटनेत एकदोन नाही तर तब्बल 66 जनावरांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे बीडच्या आष्टीमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच टेम्पोमधून 102 लहान-मोठ्या गोवंशाच्या जनावरांची कत्तलीसाठी दाटीवाटीने कोंबून वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. यात तब्बल 21 जनावरे मयत होती. गंभीर जखमी व इतर कारणांनी तब्बल 45, अशा दोन दिवसांत 66 जनावरांचा तडफडून मृत्यू झाला.
तर 36 जनावरांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी अमानुष पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंशाची तस्करी करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, एकाच वेळी 66 जनावरांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केले जात असून आरोपीवर कठोर कारवाई करा अशी मागणी होत आहे.
काय आहे प्रकरण? आष्टी शहरातून एका टेम्पोतून काही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी शहरातील किनारा चौकात सापळा लावून हा टेम्पो अडवला. यात एकाच टेम्पोत खाली 52 आणि वर फळ्यावर 50 अशी 102 जनावरे दिसून आली. ही जनावरे अक्षरश: एकावर एक दाटीवाटीत होती.
गर्दीमुळे एकमेकांना घासल्याने त्यांना जखमही झाली होती. यात काही लहान वासरेही होती. याच दाटीवाटीमुळे टेम्पोमध्येच 21 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही लहान वासरे, गायींचे गळे चिरलेले होते.
त्यामुळे टेम्पोत रक्तस्राव झालेला होता. काही जनावरांचा श्वास गुदमरल्याने आणि चेंगरुन मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत 102 पैकी 66 जनावरांचा मृत्यू झाला असून इतरांची प्रकृती चिंताजनक आहे. आष्टी ठाण्यातील पोलीस हवालदार विकास राठोड यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक जकीर जलाल शेख (वय 23, रा. हादगाव, जि.अहमदनगर) व मालक फिरोज रशीद शेख (रा. धाराशिव) या दोघां- विरोधात आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.