पोलिस दलात महासंचालकांच्या पाच पदांसह 42 पदे रिक्तच
मुंबई: महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस महासंचालक दर्जाच्या पाच पदांसह महत्त्वाची 42 पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत. पोलिस निरीक्षकांपासून अप्पर पोलिस महासंचालक पदावरील अधिकार्यांना बढत्या आणि बदल्याच देण्यात आलेल्या नसल्याने ही पदे भरली गेलेली नाहीत.
राज्य पोलिस दलात नव्याने तयार करण्यात आलेल्या दोन पदांसह एकूण महासंचालक दर्जाची 10 पदे आहेत. यातील पाच पदांवर आजघडीला अधिकारीच नाहीत. महत्त्वाच्या अशा लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह (एसीबी) महाराष्ट्र नागरी संरक्षण, पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ आणि महाराष्ट्र सुरक्षा कामगार महामंडळ या विभागात कोणीही पूर्णवेळ अधिकारी नाही. ही चार पदे गेल्या 8 ते 12 महिन्यांपासून रिक्त आहेत. या विभागातील सेवा ज्येष्ठ अधिकार्यांच्या खांद्यावर या पदांचा अतिरिक्त कार्यभार देऊन कारभार चालवला जात आहे. परिणामी अधिकार्यांवरील कामाचा ताण वाढत असून बढतीसाठी पात्र असलेल्या अधिकार्यांमध्येही नाराजी आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रमुख असलेल्या रजनीश शेठ यांनी राज्याचे पोलिस प्रमुख बनल्यापासून म्हणजेच फेब्रुवारी 2022 पासून एसीबीचे प्रमुख पद रिक्त आहे. याचा पदभार सुरुवातीला प्रभात कुमार आणि नंतर निकेत कौशिक यांना देण्यात आला. त्याचप्रमाणे, जुलै 2022 मध्ये विवेक फणसळकर यांची मुंबई पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते सांभाळत असलेले पोलिस कल्याण आणि गृहनिर्माण विभागाचे व्यवस्थापकीय संचालकपद रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त पदभार अर्चना त्यागी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
राज्यातील महासंचालकांच्या सोबतच अप्पर महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस महानिरीक्षक आणि उपमहानिरीक्षक अशी एकूण 42 महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यात महत्त्वाच्या अशा कायदा व सुव्यवस्था, वाहतूक विभाग. नक्षलविरोधी दलाच्या प्रमुख पदांसह गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) चार पदे, नागपूर पोलिस दलातील तीन अप्पर आयुक्त पदे, शस्त्र तपासणी विभाग पुणे, अनुसूचित जाती/जमाती आयोग, राज्य मानवाधिकार आयोग, राज्य दहशतवाद विरोधी विभाग, सागरी रेस्क्यू आणि विशेष रेस्क्यू, सायबर, वायरलेस विभागातील पदांचा समावेश आहे. त्यामुळे राज्य सरकार अख्ख्या पोलिस दलास वेठीस धरत असल्याची उघड चर्चा पोलिस दलात आहे.
प्रभारी कारभार
राज्य पोलिस दलातील प्रशिक्षण व खास पथकाचे पोलिस महासंचालक संजयकुमार आणि राज्य महामार्ग वाहतूकचे अप्पर पोलिस महासंचालक के. के. सरंगल हे 31 मार्चला वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीने रिक्त झालेल्या पदांचा अतिरिक्त कार्यभार तीन अधिकार्यांवर सोपविण्यात आला आहे. राज्य शासनाने संजयकुमार यांना ‘प्रशिक्षण आणि खास पथके’ मध्ये व प्रज्ञा सरवदे यांना रेल्वेमध्येच ऑगस्ट 2022 मध्ये पदाची श्रेणी वाढवून बढती दिली होती. मात्र, रिक्त असलेली महासंचालक दर्जाची पदे भरलेली नाहीत. या दोन अधिकार्यांच्या निवृत्तीनंतर, एप्रिल महिन्याच्या अखेरीस अप्पर महासंचालक (पीसीआर) विनय कारगावकर हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे पदे रिक्त होत असल्याने आता तरी ही पदे शासन भरणार का, असा सवाल विचारला जात आहे.
27 अधिकारी प्रतिनियुक्तीवर : राज्य पोलिस दलातील पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्यासह रश्मी शुक्ला, अतुलचंद्र कुलकर्णी यांच्यासह एकूण 27 अधिकारी केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. यातील रश्मी शुक्ला यांना केंद्राने पोलिस महासंचालकपदी बढती दिली असून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्याने त्या पुन्हा राज्य पोलिस दलात परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. येत्या काळात त्या राज्य पोलिस दलात परतल्यास महासंचालक पदाच्या एका जागी नियुक्ती देऊन एक पद गृह खाते भरू शकते.