ओरीजन बिझनेस पार्कला लागलेल्या आगीवर तब्ब्ल ११ तासानंतर नियंत्रण मिळविण्यात यश
ठाणे : घोडबंदर रोड परिसरातील ओरीजन बिझनेस पार्कला लागलेली आग तब्बल अकरा तासांहून अधिकच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल या दोन विभागांना यश आले आहे.
तसेच बिझनेस पार्कमधील पार्किंगला आग लागल्याने त्यामध्ये उभ्या केलेल्या ३ चारचाकी आणि २३ दुचाकी असे २६ वाहने जळून खाक झाली आहेत.
यावेळी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला इतर पाच महापालिकांसह मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या अग्निशमन दलाचे साथ लाभली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. पण पार्कचे ४ आणि ५ वा हे दोन मजले आणि ३ मजल्यावरील बऱ्यापैकी भाग जळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच दुपारी दोन वाजेपर्यंत कुलिंगचे काम सुरूच होते. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
ओरियन बिझनेस पार्क हा तळ अधिक ५ मजली असून तेथे २४ ऑफीस गाळे आहेत. त्या पार्कला मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. याचदरम्यान एसीच्या गॅसचा स्फोट होऊन आग आणखी भडकली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतुक पोलीस,अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष या विभागांनी धाव घेतली. तसेच तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. पण आग हळूहळू पार्कच्या टेरेसवर ही पोहोचली. त्यात ४ आणि ५ मजले जळून खाक झाले.
तसेच या आगीची झळ ही बाजूला असलेल्या सिनेवंडर या मॉल ही बसली. याचदरम्यान आग नियंत्रणात येत नसल्याने ठामपा अग्निशमन दलाच्या मदतीला मुंबई, नवीमुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर , मीरा-भाईंदर आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स हे अग्निशमन दल ,ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठामपा पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, तसेच अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांनी धाव घेतली. तर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केल्यावर ११ तासांनी आग नियंत्रणात आली. त्यानंतर अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुटके निःश्वास टाकला.
मात्र बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत कुलिंगचे काम सुरू होते. यावेळी ०७ फायर वाहन, ०२ रेस्क्यू वाहन ,०८ वॉटर टँकर , ०३ जम्बो वॉटर टँकर, ०१ ब्रांनटो वाहन , ०६ जीप वाहन, ०१ बुलेट वाहन, ०४ ठामपा पाणीपुरवठा विभागामार्फत प्रायव्हेट वॉटर टँकर आणि ०१ ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत पिकअप वाहन व ०२ जेसीबी मशीन पाचारण करण्यात आले होते. तसेच हा पार्क मुख्य रस्त्याच्या बाजूला असल्याने वाहतूक कोंडीचे चित्र पाहण्यास मिळून आले.
” आग आणि त्यातच एसीच्या गॅसचा झालेला स्फोटमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ११ तास आले. यामध्ये २६ वाहने जळून खाक झाली असून पार्क, मॉल आणि पार्किंगचे नुकसान झाले आहे. ठामपाच्या मदतीने इतर महापालिकेच्या अग्निशमन दल धावून आले. या आगीत जीवितहानी झाली नाही पण वित्तहानी झाली आहे.”
– अविनाश सावंत- अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष,ठामपा