समृद्धी महामार्गावर अपघातात पती-पत्नी ठार
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2023/04/Screenshot_2023-04-05-13-35-13-38_a71c66a550bc09ef2792e9ddf4b16f7a.jpg)
बुलढाणा:समृद्धी महामार्गावर कार समोरील वाहनावर धडकून झालेल्या अपघातामध्ये पुणे येथील पती-पत्नीचा मृत्यू झाला असून चालक जखमी झाला आहे.हा अपघातात सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड नजीक ४ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. ईश्वरी पाध्ये (६०) आणि अमित पाध्ये (६७, दोघे रा. पुणे) अशी मृत्यू पावलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. वाहन चालवीत असलेला त्यांचा मुलगा आशिष पाध्ये हा जखमी झाला आहे.
हे तिघेही पुण्यावरून नागपूरकडे जात होते. दरम्यान दुसरबीड नजीक आशिष पाध्येने कार चालवीत असतांना त्याचे एमएच-१४-एफजी-९१०७ क्रमांकाचे वाहन नागपूरकडे जात असताना सिंदखेड राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चैनेज नं. ३३१.९ जवळ समोर असलेल्या एमएच-१६-एई-९४६४ क्रमांकाच्या वाहनाला पाठीमागून धडकले व हा अपघात झाला.
यामध्ये आशिष पाध्ये यांची आई ईश्वरी पाध्ये आणि वडील अमित पाध्ये यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक आशिष पाध्येला मुका मार लागल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे. त्याला तत्काळ महामार्ग पोलिस एपीआय अरुण बकाल, पोलिस नायक विठ्ठल काळुसे, मिलिंद ताकतोडे व सचिन नाईक, अविनाश राठोड, श्रावण घट्टे, जयकुमार राठोड व सहकाऱ्ायंनी सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तसेच सिंदखेड राजा पोलिसांच्या मदतीने समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.