येरवडा कारागृहात तपासणीदरम्यान बाथरुममध्ये सापडला मोबाईल
पुणे : येरवडा कारागृहातील एका बराकीमधील बाथरुममध्ये मोबाईल फोन आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याप्रकरणी कारागृह विभागाच्या वतीने सागर बाजीराव पाटील (वय ३८, रा. जेल वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातील अधिकारी भिरु सोमनाथ खळबुटे, अतुल तोवर हे कारागृहातून सर्कल क्रमांक १, बरॅक क्रमांक ३ मधील बाथरुमची झडती घेत असताना तेथील बाथरुमच्या वर फिर्यादी यांना पत्रा वाकलेला दिसला. त्या ठिकाणाची झडती घेतली असता तेथे एक काळ्या रंगाचा नोकिया कंपनीचा मोबाईल आढळून आला.
ही बाब अधिकार्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना कळविली. कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी याबाबत दोषींवर कारवाईसाठी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. हा मोबाईल नेमका कोणी ठेवला होता. त्यावरुन कोण, कोण कोणाशी बोलले, याची माहिती घेतली जात आहे. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करीत आहेत.