रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने चालविली ॲम्ब्युलन्स; विष प्राशन केलेल्या युवकाचे वाचविले प्राण
नाशिक : निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विषप्राशन केलेल्या युवकावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले.
मात्र, रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने आणि रात्रीच्या वेळी वाहनांची उपलब्धता नसल्याने, त्याला तातडीने निफाडच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचविण्यासाठी महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियांका पवार यांनी स्वतः ५ महिन्यांची गरोदर असतानाही शासकीय रुग्णवाहिका चालवत रुग्णाला निफाडच्या रुग्णालयात पोहोचवून त्याचे प्राण वाचविले.
मांजरगाव येथील २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन केले असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रात्री आठच्या सुमारास म्हाळसाकोरेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणले. तिथे कार्यरत महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.पवार यांनी त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले. मात्र, रुग्णाला तातडीने पुढील आधुनिक उपचारांची आवश्यकता असल्याचे त्यांच्या लक्षात आले, परंतु रुग्णवाहिका चालक रजेवर असल्याने बाका प्रसंग उद्भवला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ.पवार या स्वत: गरोदर असूनही त्याचा विचार न करता, आरोग्यसेवक संसारे यांना सोबत घेऊन रुग्णवाहिका चालवत निफाडच्या ग्रामीण रुग्णालयात तातडीने पोहोचल्या. त्यामुळेच रुग्णाचा जीव वाचल्याने त्यांच्या या धाडसी कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
डॉक्टरांच्या तोंडून घडलेला प्रकार
कीटकनाशक घेतलेला रुग्ण रुग्णालयात आला. त्याला तातडीने दोन इंजेक्शन दिले. मात्र, रुग्णाचा पल्सरेट अत्यंत कमी लागत होता. अशा परिस्थितीत रुग्णाला पुढील उपचारासाठी निफाडला पोहोचविणे आवश्यक होते. त्यात आमच्या केंद्रावरचा ॲम्ब्युलन्स चालक हा रजेवर होता. अखेर मीच ॲम्ब्युलन्स चालवत त्या रुग्णाला घेऊन निफाडचे ग्रामीण रुग्णालय अवघ्या २० मिनिटांत गाठले. रुग्ण बचावल्याचा आनंद आहे.
– डॉ. प्रियांका पवार, वैद्यकीय अधिकारी.