देशात अचानक हार्ट अटॅकमुळे मृत्यू का होत आहेत?
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याची बरीच प्रकरणं समोर आली आहेत. नाचता-गाता, उठता-बसता, चालता-बोलता किती तरी जणांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. अचानक हार्ट अटॅकची प्रकरणं का वाढली, हा सर्वांना पडलेला प्रश्न. तज्ज्ञ डॉक्टरांनी यामागील कारणं सांगितलीच आहेत. पण आता केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनीही यावर उत्तर दिलं आहे.
नेटवर्क 18 च्या रायझिंग इंडिया या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया सहभागी झाले. देशातील अचानक हार्ट अटॅक प्रकरणांबाबतही ते रायझिंग इंडियाच्या मंचावर बोलले.याप्रकरणी आयसीएमआर तपास करत आहे. दोन महिन्यांत याचा रिपोर्ट येईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.
आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महासाथीच्या काळात लशीच्या बाबतीत देशातील शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवला होता, मात्र विरोधकांनी लशीवर प्रश्न उपस्थित केले. भारतात बनवलेल्या लशीने केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील लोकांचे प्राण वाचवले आहेत. रायझिंग इंडिया समिट 2023 न्यूज 18 नेटवर्क आणि पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (सायरस पूनावाला ग्रुप) ने ‘रायझिंग इंडिया समिट 2023’ या दोन दिवसीय कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं. दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेसमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यंदाचा विषय आहे ‘द हीरोज ऑफ रायझिंग इंडिया’. ज्याचा उद्देश सर्वसामान्य भारतीयांच्या असामान्य कामगिरीवर प्रकाश टाकणं हा आहे. यादरम्यान अशा वीरांचा गौरव करण्यात आला ज्यांनी आपल्या अनोख्या उपायांनी तळागाळात सुधारणा करून लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडला. संमेलनाचा पहिला दिवस शानदार होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिवहन, रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. त्यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.