ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

अमित शाह यांचा काँग्रेसवर मोठा आरोप


नवी दिल्ली:केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी काँग्रेसवर मोठा आरोप केला. काँग्रेसची त्यांच्या शासन काळात सीबीआयच्या मदतीने नरेंद्र मोदीं यांना खोट्या प्रकरणात अडकविण्याची इच्छा होती.एवढेच नाही, तर नरेंद्र मोदींना बनावट चकमक प्रकरणात अडकविण्यासाठी सीबीआयने आपल्यावर दबाव टाकला होता, असे शाह यांनी म्हटले आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आपण स्वतः राज्याचे गृहमंत्री होतो, असेही अमित शहा यांनी सांगितले.

अमित शहा म्हणाले. “मी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा बळी आहे. काँग्रेसने आमच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला नव्हता का? एक एन्काउंटर झाले. तेव्हा मी गुजरात राज्याचा गृहमंत्री होतो. सीबीआयने मला अटक केली. जर काँग्रेस सरकारने ते मिटवले नसेल, तर आजही सीबीआयच्या रेकॉर्डमध्ये असेल. 90% प्रश्नांमध्ये हेच होते की, ‘तुम्ही कशाला त्रास घेताय, मोदींचे नाव घ्या, तुम्हाला सोडून देऊ.’ शाह नेटवर्क18 समूहाच्या ‘रायजिंग इंडिया सम्मेलन 2023’ मध्ये बोलत होते.

यावेळी काँग्रेसला आरसा दाखवताना अमित शहा म्हणाले, “त्यावेळी आम्ही तर काळे कपडे घातले नाहीत. आम्ही आंदोलनही केले नाही. एका राज्याचे मुख्यमंत्री असताना मोदीजींच्या विरोधात एसआयटी स्थापन केली गेली. भ्रष्टाचाराचे कोणतेही प्रकरण नव्हते. दंगलीत भूमिका असल्याचे खोटे प्रकरण बनवले गेले, जे शेवटी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. आम्ही काहीही आदळ-आपट केली नाही. आम्ही कधीही काळे कपडे घालून संसद ठप्प केली नाही.” एवढेच नाही, तर “मला अटक करण्यात आली. उच्च न्यायालयाने मला 90 दिवसांत जामीन मंजूर केला. त्यावेळी, मला अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे,” ही आठवणही यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी करून दिली.

शाह पुढे म्हणाले, “काँग्रेसने आपल्याविरुद्ध गुजरातबाहेर मुंबईत खटला चालवला. पण तरीही आमची काहीच हरकत नव्हती. तेथील न्यायालय म्हणाले, “राजकीय सूडबुद्धी आणि राजकीय इशाऱ्यावर सीबीआयने ही केस केली आहे. त्यामुळे आम्ही अमित शहा यांच्यावरील खटला आणि सर्व आरोप फेटाळून लावतो. आम्ही आदळ-आपट केली नाही. तेव्हाही, पी. चिदंबरम, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच लोक होते. पण आम्ही त्यांच्यावर कोणताही खोटा गुन्हा दाखल केलेला नाही.”

केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या आरोपांवर शाह म्हणाले, “आम्ही 2014 च्या निवडणुकीत आश्वासन दिले होते की, आमची लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध आहे. आणीबाणीच्या काळात लाखो निष्पाप नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते,” हा आठवणही शाह यांनी यावेळी करून दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button