पत्नीचा खून करून मृतदेह लपविण्यासाठी तिच्या शरीराचे टाइल कटिंग मशीनने 6 तुकडे केले आणि…
छत्तीसगडमधल्या बिलासपूरमध्ये एका व्यक्तीने पत्नीचा खून करून मृतदेह लपविण्यासाठी तिच्या शरीराचे टाइल कटिंग मशीनने 6 तुकडे केले आणि ते घरातच पाण्याच्या टाकीत लपवून ठेवले. सती साहू असं मयत महिलेचं नाव आहे. आरोपी पवन सिंहला पोलीस दुसऱ्या एका गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी गेले होते.
तेव्हा खुनाचा हा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपीने पत्नीची हत्या ही 6 जानेवारी 2023ला केली होती. पोलिसांनी पवन सिंहला अटक केली आहे. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलंय.
बिलासपूर शहरातल्या उसलापूर भागातली ही घटना आहे. पवनने आवडत्या मुलीशी लग्न केलं होतं आणि तिचाच त्याने निर्घृण खून केलाय. आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखा प्लॅन केला होता. पत्नीला मारल्यानंतर त्यानं प्रथम टाइल कटिंग मशीनने तिच्या मृतदेहाचे 6 तुकडे केले.
त्यानंतर हे तुकडे हवाबंद पॉलिथिनमध्ये पॅक करून ती पिशवी डक्ट टेपच्या मदतीने बंद केली व पाण्याच्या टाकीत लपवून ठेवलं. मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्याचं नियोजन होतं, असे आरोपीने पोलिसांना सांगितले; पण तो ज्या घरात राहत होता, तिथे काम सुरू होतं. त्यामुळे त्याला संधी मिळू शकली नाही. दरम्यान, बनावट नोटांप्रकरणी पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून त्याला पकडलं आणि त्या वेळी या खुनाचा उलगडा झाला.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेंद्र जयस्वाल यांनी सांगितलं की, ‘आरोपीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यामुळे त्याने तिचा खून केला. आरोपी पवनचा शोध बनावट नोटांसंदर्भात पोलीस घेत होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीच्या घरी छापा टाकला.
घराची झडती घेत असताना त्यांना पाण्याच्या टाकीत मृतदेहाचे तुकडे दिसले. या प्रकरणी चौकशी केली असता त्याने ते पत्नीच्या मृतदेहाचे असल्याचं सांगितलं. हे ऐकून पोलिसांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ ते तुकडे ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून तपास सुरू केला.’ सतीचे मेहुणे राजकुमार साहू यांनी सांगितलं की, ‘सती डिसेंबरमध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती.
त्या वेळी ती खूप अस्वस्थ दिसत होती. तिनं सांगितलं, की नवरा तिला खूप मारायचा. सतीने एकदा पोलीस ठाण्यात नवऱ्याविरोधात तक्रारही दिली होती. यानंतर पुन्हा एकदा सती व तिच्या नवऱ्यामध्ये समझोता झाला होता.
सुमारे 15 दिवसांपूर्वी माझा मुलगा पुसार मावशी सतीला भेटण्यासाठी उसलापूरला गेला होता. तेव्हा त्याला पवननं सांगितलं, की मुलं घरी आहेत आणि सती एका मुलासह पळून गेली आहे.
सतीची बहीण सीता आणि कुटुंबीयांनी सांगितलं की, ‘पवन सिंह दररोज तिच्याशी भांडत असे. सतीला बहिणीच्या घरी जाण्यासही त्याने मनाई केली होती. कधी कधी ती बहिणीला भेटायला जायची, तेव्हा तो तिचा छळ करायचा.
त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ती घरी येत नव्हती. सतीचा फोन न आल्याने संशय येत होता. पण, पवनने ती पळून गेल्याची अफवा पसरवली होती.’ आरोपी पवन बनावट नोटा छापून बाजारात चालवायचा. पोलीस त्याचा बऱ्याच दिवसांपासून शोध घेत होते.
राजेंद्र जयस्वाल म्हणाले, की ‘त्याच्याकडून 500 रुपयांच्या तीन बनावट नोटा, 200 रुपयांच्या सात बनावट नोटा आणि काही खऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटा बनवण्यासाठी तो खास कागद वापरत होता. हा कागद तो बेंगळुरूतून ऑनलाइन ऑर्डर करत होता. तो फोटोग्राफीचं काम करतो.
यामुळे त्याला कागदाची चांगलीच माहिती होती.’ बनावट नोटा छापण्यासाठी आरोपीने काही जणांकडून प्रशिक्षणही घेतलं होतं. तसंच इंटरनेटवरून यासंबंधी माहिती त्याने मिळवली आणि तो तरबेज झाला. आरोपीला प्रशिक्षण देणाऱ्या दोन तरुणांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. पोलिसांनी काही ठिकाणी छापेसुद्धा टाकले आहेत. फरार आरोपींच्या अटकेनंतर मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.