विधवा शिक्षिकेवर मुख्याध्यापकाची वाईट नजर, शारिरीक संबंधांसाठी दबाव
चुरू: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल चुरूच्या जिल्हाधिकाऱ्यांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला.
मुलींना वाचवून त्यांना पुढे नेण्यासाठी जिल्ह्याच्या डीएमचा बहुमान झाला असेल, पण एका घटनेने महिलांची स्थिती काय आहे हे सर्व काही स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातीलच एका सरकारी शाळेतील महिला शिक्षिकेची धक्कादायक कहाणी सर्वांनाच हादरवून गेली आहे. सरकारी विधवा शिक्षिकेचा शाळेतच लैंगिक छळ होत असल्याची घटना समोर आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला, असा आरोप एका महिलेने केला आहे.
तसेच तिने न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे मुख्याध्यापकांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. चुरू जिल्ह्यातील राजगढ तहसीलच्या हमीरवास पोलीस ठाण्यांतर्गत एका गावाच्या सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील ही घटना आहे. येथील एका शिक्षिकेवर शाळेच्या मुख्याध्यापकाने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला.
तसेच तिचा लैंगिक छळही केला, असा आरोप या शिक्षिकेने केला आहे. याबाबत विभागीय स्तरावर तक्रार केली होती, मात्र तरीही आरोपी मुख्याध्यापकावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. यानंतर ती हमीरवास पोलिस ठाण्यात गेली, तेथे तिला 4 तास बसवून ठेवण्यात आले.
मात्र, तरीसुद्धा सुनावणी न झाल्याने तिने चुरूचे एसपी कार्यालय गाठून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार सोपवली आणि न्यायाची याचना केली. क्लास सुरू असताना मध्येच बोलवून घ्यायचा – महिला शिक्षिकेने सांगितले की, ती 2016 पासून सरकारी शाळेत तृतीय श्रेणी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तिच्या पतीचे निधन झाले आहे. शाळेचे मुख्याध्यापक सुमेर सांगवान हे तिच्यावर शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकून अत्याचार करत असल्याचा आरोप तिने केला आहे.
तसेच तिने मुख्याध्यापकांवर अश्लील हावभाव केल्याचा आरोपही केला आहे. विधवा शिक्षिकेने सांगितले की, सुमेर सांगवान तिला सतत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकतो. ती वर्गात शिकवत असतानाही आरोपी मुख्याध्यापक कर्मचाऱ्याला पाठवून तिला आपल्या खोलीत बोलावून तिच्यासोबत अश्लील कृत्य करतो. तिने त्याच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले नाही तर तो तिला धमकीही देत होता. याप्रकरणी आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी या विधवा शिक्षिकेने केली आहे.