त्र्यंबकेश्वरची घटना हृदय पिळवटून टाकणारी, रुपाली चाकणकर संतापल्या
नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरतालुक्यातील आरोग्य केंद्रातील घटना अतिशय धक्कादायक आहे.
या प्रकरणामुळे राज्यातील आरोग्य आणि कायदा सुव्यवस्था किती ढासळलेली आहे हे अधोरेखित होत आहे. राज्य महिला आयोगाने या तिन्ही घटनांची दखल घेतली असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशा सूचना आरोग्य संचालकांना दिल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली.
राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचे पुन्हा एकदा नाशिकच्या घटनेने अधोरेखित झाले. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यात प्रसुतीसाठी (Delivery) आलेल्या गर्भवती महिलेची डॉक्टर नसल्याने आईनेच प्रसुती केल्याची धक्कादायक घटना घडली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी (Anjneri) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा हा भोंगळ कारभार समोर आला आहे. आरोग्य केंद्रात एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने आशा वर्कर आणि आईलाच मुलीची डिलिव्हरी करावी लागल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेसंदर्भात रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली असून हृदय पिळवटून टाकणारी घटना असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान कालच नागपूर (Nagpur) अंबाझरी तालुक्यामध्ये एका अल्पवयीन गर्भवतीने युटुबवर बघून स्वतःची डिलिव्हरी केली. त्यात तिच्या बाळाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यात खड्ड्यात गेलेल्या रस्त्यामुळे गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसुती झाल्याची घटना घडली आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना राज्यातील बिघडलेली कायदा आणि आरोग्य व्यवस्था अधोरेखित करत असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे त्या म्हणाल्या की, यामुळे राज्यातील आरोग्य आणि कायदा सुव्यवस्था किती ढासळलेली आहे हे अधोरेखित होत आहे. राज्य महिला आयोगाने या तिन्ही घटनांची दखल घेतली असून या घटनांतील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे सूचना अशा सूचना आरोग्य संचालकांना दिलेल्या आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
आईनेच केली मुलीची डिलिव्हरी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे गावाजवळ दहा पंधरा कुटुंबीयांची वस्ती असलेली बरड्याचीवाडी आहे. येथील यशोदा त्र्यंबक आव्हाटे या गर्भवती महिलेस प्रसूती काळा जाणवत असल्याने आज सकाळीच आई सोनाबाई आव्हाटे यांच्यासोबत अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या. मात्र आरोग्य केंद्रात दाखल झाल्यानंतर या ठिकाणी एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नव्हते. यावेळी प्रसूती वेदना वाढत असल्याने सोबत असलेल्या आई आणि आशा वर्करने प्रसूती करण्याचे ठरविले. त्यानुसार त्या विवाहित महिलेच्या आईने स्वतः बाळाचा जीव धोक्यात घालुन प्रसूती केली. विवाहितेच्या आईने कशीबशी तरी डिलिव्हरी केली. यावेळी या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणाले…
संबंधित आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकऱ्यांची नियुक्ती आहे. रविवार असल्याने एक वैद्यकीय अधिकारी एका परीक्षेसाठी बाहेर गावी गेले होते. तर दुसरे वैद्यकीय अधिकारी विनापरवानगी गैरहजर होते. अशावेळी आरोग्य केंद्रात एका सिस्टर 24 तास असते. महिला ज्यावेळी आरोग्य केंद्रात दाखल झाली त्यावेळी लेबर पेन सुरु असल्याने त्यांची डिलिव्हरी झाली. यावेळी कर्मचारी हे सिस्टरला बोलवायला गेलेच होते, मात्र तोपर्यंत प्रसूती झाली होती. सद्यस्थितीत चौकशी सुरु आहे. दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी हर्षल नेहते यांनी दिली.