ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेपाळमधून टोमॅटो आयातीचा निर्णय; भाववाढीचा केंद्राने घेतला धसका


पुणे: देशभरात झालेल्या टोमॅटोच्या दरवाढीचा धसका घेत चिंताग्रस्त झालेल्या केंद्र सरकारने अखेर नेपाळमधून टोमॅटो आयातीचा निर्णय घेतलेला आहे. टोमॅटोची ही आयात 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत राहणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने 4 ऑगस्ट रोजी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.
सध्या बाजारपेठेत टोमॅटोच्ेटचा घाऊक दर 700 ते 1100 रुपये असून, किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा दर 150 ते 160 रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे आयात टोमॅटोची आवक कधी सुरू होऊन ती वाढणार त्यानुसार दरपातळीवर परिणाम होईल.



तर आवक वाढल्यास टोमॅटोचे दर घटून देशांतर्गत टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे नेपाळमधील टोमॅटोची प्रत्यक्ष होणारी आयात किती लवकर आणि किती प्रमाणात होणार, त्यानुसार दर पातळीवर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती कृषी व पणन विभागातील सूत्रांनी दिली. नेपाळमधून भारतात टोमॅटो फळांच्या वापरासाठी आयात करण्याच्या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिली आहे.

तसेच आयात करताना तेथील कीडरोगमुक्त टोमॅटोच्या आयातीवर (विश्लेषण अहवाल आणि फायटोसॅनिटरी परिस्थिती) लक्ष केंद्रित करण्याबाबत फरीदाबाद (हरियाणा) येथील वनस्पती संरक्षण सल्लगार यांना दिलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आयात टोमॅटोची आवक वाढल्यानंतरच बाजारातील दरावर परिणाम संभवू शकतो, असेही सांगण्यात आले.

राज्यात 41 हजार हेक्टरवर टोमॅटो लागवड

राज्यात खरीप हंगामात सरासरी 41 हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड केली जाते. तर प्रतिहेक्टरी उत्पादकता 20.83 मेट्रिक टनाइतकी राहते. त्यामुळे उशिराने सुरू झालेल्या पावसामध्ये टोमॅटो लागवड झाली असली, तरी पीक येण्यास अवधी लागणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन विभागातून देण्यात आली.

स्थानिक बाजारात महिनाअखेर टोमॅटो आवक वाढेल

पुणे बाजारपेठेत जून महिनाअखेर टोमॅटोचा दर 10 किलोस 40 ते 60 रुपये होता, तर किरकोळ विक्री किलोस 8 ते 10 रुपयांच्या आसपास होती. शेतकर्‍यांनी बाजारभाव नसल्याने अक्षरश: टोमॅटो फेकून दिला आणि बाजारातील आवक घटण्यास सुरुवात झाल्याचे सांगून मार्केट यार्डातील आडते विलास भुजबळ यांनी सांगितले, की सध्या घाऊक बाजारात टोमॅटोच्या 10 किलो क्रेटचा घाऊक दर 700 ते 1100 रुपये असून, किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा दर 150 ते 160 रुपयांच्या आसपास आहे. शेतकर्‍यांनी जादा दरामुळे टोमॅटोची लागवड केलेली आहे. मात्र, पावसाने उशिराने हजेरी लावल्यामुळे ऑगस्ट महिनाअखेर टोमॅटो आवक वाढण्यास सुरुवात होईल. तोपर्यंत टोमॅटोचे दर तेजीत स्थिरावण्याची अपेक्षा असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button