ताज्या बातम्यामहाराष्ट्र

लिथिअम आयर्ननंतर सोन्याची खाण; भारताच्या हाती लागला आणखी एक मोठा जॅकपॉट


ओडिशातील देवगड, केओंझार आणि मयूरभंज या तीन जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे सापडल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ओडिशाच्या खाण मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की, गेल्या २ वर्षांपासून भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि ओडिशाचे भूविज्ञान संचालनालय याबाबत सर्वेक्षण करत होते.

जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा खजिना मिळाल्यानंतर आता भारताला आणखी एक जॅकपॉट मिळाला आहे. ओडिशातील ३ जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि ओडिशाच्या भूगर्भशास्त्र संचालनालयाने देवगड, केओंझार आणि मयूरभंजमध्ये सोन्याचे साठे असल्याचे संकेत दिले आहेत.

या तीन जिल्ह्यांतील ज्या भागात सोन्याचा साठा दर्शविला गेला आहे त्यामध्ये दिमिरमुंडा, कुष्कला, गोटीपूर, केओंझार जिल्ह्यातील गोपूर, मयूरभंज जिल्ह्यातील जोशीपूर, देवगड जिल्ह्यातील सुरियागुडा, रुन्सिला, धुशुरा हिल आणि अडास यांचा समावेश आहे. या क्षेत्रातील पहिले सर्वेक्षण खाण आणि भूविज्ञान संचालनालय आणि GSI यांनी १९७० आणि ८०च्या दशकात केले होते. तथापि, त्याचे निकाल सार्वजनिक करण्यात आले नव्हते.

राज्याचे खाण मंत्री प्रफुल्ल कुमार मलिक म्हणाले की, जीएसआयने गेल्या दोन वर्षांत या तीन जिल्ह्यांमध्ये आणखी एक सर्वेक्षण केले आहे. ढेंकनालचे आमदार सुधीर कुमार सामल यांनी विधानसभेत सोन्याच्या साठ्याशी संबंधित प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना प्रफुल्ल कुमार यांनी तीन जिल्ह्यांमध्ये ‘खजिना’ सापडल्याची सांगितली. मात्र, सध्या तीन जिल्ह्यांत सापडलेल्या सोन्याच्या साठ्यात किती सोन्याचे प्रमाण आहे, हे स्पष्ट झालेले नाही.

यापूर्वी, जम्मू आणि काश्मीरमध्ये सापडलेला लिथियमचा साठा ५.९ दशलक्ष टन आहे. जो चिली आणि ऑस्ट्रेलियानंतर जगातील सर्वात मोठा आहे. या शोधानंतर भारत लिथियम क्षमतेच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. लिथियम हा असा नॉन-फेरस धातू आहे, ज्याचा वापर मोबाईल-लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहनांसह अनेक वस्तूंसाठी चार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. या दुर्मिळ पृथ्वी घटकासाठी भारत सध्या इतर देशांवर अवलंबून आहे.

जगातील लिथियम साठ्याची स्थिती पाहिली तर या बाबतीत चिली ९.३ दशलक्ष टनांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया ६३ लाख टनांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. काश्मीरमध्ये ५९ लाख टन साठा मिळाल्यानंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अर्जेंटिना २७ दशलक्ष टन साठ्यासह चौथ्या, चीन २ दशलक्ष टन साठ्यासह पाचव्या आणि अमेरिका १ दशलक्ष टन साठ्यासह सहाव्या स्थानावर आहे. आत्तापर्यंत भारतात आवश्यक असलेल्या लिथियमपैकी ९६ टक्के लिथियम आयात केले जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च करावे लागते. २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताने लिथियम आयन बॅटरीच्या आयातीवर ८९९४ कोटी रुपये खर्च केले. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे २०२१-२२ मध्ये, भारताने १३,८३८ कोटी रुपयांच्या लिथियम आयन बॅटरी आयात केल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button