अन् सुंदर स्वप्नांच्या संसाराची राखरांगोळी झाली; गाढ झोपेत असताना घर जळून खाक

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


भंडारा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गाढ झोपेत असताना अचानक एका व्यक्तीच्या घराला आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालं आहे.
सदर घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सिंदपुरी येथिल जितेंद्र कटरे यांच्या घराला काल (शनिवारी) रात्रीच्या सुमारास आग लागली होती. आग लागली तेव्हा कटरे कुटुंबिय घरात झोपले होते. आग लागल्यानंतर बाहेरच्या बाजूने आगीने संपूर्ण घराला वळसा घातला. घर आपल्या कवेत घेत आग मोठ्या प्रमाणावर पसरत गेली. मात्र घरातील व्यक्तींना याची अजिबात भनक लागली नाही. ते गाढ झोपेतच होते.पहाटे ४ वाजता शेजारील एका व्यक्तीने हा धक्कादायक प्रकार पाहिला.तेव्हा त्यांनी आरडोओरडा करत शेजारच्या इतर व्यक्तींना बाहेर बोलावले. कटरे यांचे घर आगीमध्ये जळत असल्याचे पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे त्यांनी कटरे यांना मोठ मोठ्याने आवाज द्यायला सुरूवात केली. जितेंद्र कटरे यांना जाग येताच त्यांनी घराला आग लागल्याचे पाहिले.

आपली सुटका करून घेत हे सर्वजण घरातून बाहेर पडले. कुटुंबातिल कोणत्याही व्यक्तीस इजा झालेली नाही. सर्व सुखरूप आहेत. मात्र त्यांचे सोन्यासारखे घर त्यांच्या डोळ्यासमोर जळून खाक झाले. या आगीत कटरे यांच्या संसाराची राखरांगोळी झाली. मात्र कुटुंबातील सर्व व्यक्ती सुरक्षित असल्याने कटरे यांना धीर मिळाला आहे.

कशामुळे लागली आग?

आग नेमकी कोणत्या कारणाने लागली या बाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र शॉर्टसर्कीटमुळे ही लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.