ज्येष्ठांना चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या चौघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


आंबेगाव तालुक्‍यातील थोरांदळे व धामणी येथे ज्येष्ठ दांपत्याला चाकूचा धाक दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन रात्रीच्या वेळी लुटणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिसांनी संगमनेर तालुक्‍यातून अटक केली आहे. यातील तिघांना पुढील तपास कामासाठी मंचर व पारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

रवींद्र भाऊसाहेब फड (वय 30), नंदकुमार पवार (वय 21), वैभव दिगंबर नागरे (वय 20, तिघे रा. दरेवाडी, ता. संगमनेर) व अतिष बाळासाहेब बडवे (वय 23, रा. पिंपरी लौकी, ता. संगमनेर) अशी आरोपींचे नावे आहेत. मंचर पोलीस ठाण्याचे हद्दीत थोरांदळे येथे बुधवारी (दि. 8) रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी ज्येष्ठ दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवत 3 लाख 51 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती.

तसेच पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धामणी येथे गुरुवारी (दि. 16) अशाच प्रकारे ज्येष्ठ दाम्पत्याला हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवत अडीच लाखांचा मुद्देमाल लुटून नेला होता. याप्रकरणी मंचर, पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही घटनामध्ये साम्य दिसत असल्याने याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली होती.

या तपासासाठी सहायक निरीक्षक महादेव शेलार, साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, पोलीस जवान अक्षय नवले, सुपेकर, वीरकर असे पथक तयार केले होते. गुन्ह्याचा तपास करत असताना सीसी टीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाल्याने दरेवाडी भागात सापळा लावून आकाश फड याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दोन्ही ठिकाणचे गुन्हे त्याचे इतर चार साथीदार रवींद्र फड, वैभव नागरे, अतिष बडवे व नंदकुमार पवार यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. आरोपींकडे गुन्ह्यामध्ये चोरून नेलेल्या सोन्याच्या दागिन्याबाबत विचारपूस केली असता ते दागिने हे साकुर (ता. संगमनेर) येथील साई आदर्श को. ऑ. सोसायटीमध्ये तारण ठेवल्याचे सांगितले.