बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाची महिलेला धमकी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : ( आशोक कुंभार )बलात्काराच्या गुन्ह्याची तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातील उपहारगृहाजवळ ही घटना घडली.

याबाबत एका ५० वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत भगवान माने (वय ५३, रा. मधुबन सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माने सोलापूर येथील केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात नियुक्तीस आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी ओळखीचे आहेत. चंद्रकांत माने हा पुण्यात नियुक्तीस होता. त्या वेळी त्याची फिर्यादी महिलेशी ओळख झाली होती. माने याने महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला.

महिलेने २०२० मध्ये समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती तसेच तिने सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याविरोधात माने याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मानेने १७ फेब्रुवारी रोजी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तिला शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातील उपहारगृहाजवळ बोलावले. बलात्काराची तक्रार मागे घे. तुला जीवे मारु, अशी धमकी त्याने महिलेला दिली. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर माने याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक साळवे तपास करत आहेत.