आगरी समाज बांधव लढवय्ये; देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आगरी समाजाचे मोलाचे योगदान – छगन भुजबळ

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


घोटी येथे आगरी महोत्सवाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन

आगरी समाज बांधव लढवय्ये; देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आगरी समाजाचे मोलाचे योगदान – छगन भुजबळ

महोत्सवाच्या माध्यमातून आगरी समाजाच्या कला गुणांना मिळेल वाव- छगन भुजबळ

 

नाशिक : आगरी समाज हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा घटक असून, या समाजाने महाराष्ट्राच्या संरक्षणात बहुमोल योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक समाजांचे लोक होते. यामध्ये आगरी समाजाचाही समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले आरमार उभे केले तेव्हा त्यात आगरी समाज आघाडीवर होता. पुढे अनेक वर्षे या लढवय्या समाजाने स्वराज्यासाठी आपले रक्त सांडले. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ग. ल. पाटील, ना. ना. पाटील यांनी मोठे योगदान दिले असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज घोटी येथे आयोजित आगरी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार शिवराम झोले,बाळासाहेब गाढवे,उदय जाधव, गोरख बोडके,निवृत्ती जाधव,भगवान आडोळे,रामदास आडोळे, गणपतराव कडू, हरिष चव्हाण, रघुनाथ तोडके,शिवा काळे, प्रा.प्रकाश कोल्हे, संपतराव काळे, सुनील जाधव, विनायक गतीर, नंदलाल फागडे, देवराम म्हसने, व्यंकट बागडे, लालू दुबासे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की,
आगरी समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे.
अलिबाग पनवेल,उरण,ठाणे,आणि कल्याण तालुक्यातील ९५% पेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत. या चारही तालुक्यात सर्वात जास्त आगरी लोकसंख्या आहे. तर भिवंडी,पेण तालुक्यातील ८०% पेक्षा गाव आगरी लोकवस्तीची आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व घोटी परिसरात सुमारे २५ ते ३० हजार इतकी आगरी बांधवांची लोकसंख्या आहे.आगरी माणसाची संस्कृती, त्याच्या परंपरा, त्याचा लढाऊ बाणा, त्याची कलात्मकता सारे काही महाराष्ट्रातल्या कोकणाशी नाते सांगणारे असल्याने ठाणे, मुंबई व रायगड या तीन मुख्य विभागात वस्ती करून राहिलेला आगरी माणूस हा इथला भूमिपुत्र आहे येथील भूमिपुत्र असल्याने या समाजाने घोटी परिसराच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे. आणि मुख्य म्हणजे या समाजाचा एकोपा अतिशय महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपला लढा सुरू आहे. त्यात आपला विजय नक्कीच होणार आहे. त्यासाठी सर्व ओबीसी घटकांनी एकत्रित राहून काम करावे. आगरी समाज ओबीसी समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्व घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, घोटी परिसरात वास्तव्यास असलेल्या या समाज बांधवांनी आपल्या कला गुणांना वाव देण्याच्या दृष्टीने पाच दिवसीय आगरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. आगरी माणूस जसा उत्तम शिल्पकार, तसाच तो नावाजलेला संगीतकारही आहे. घोटी येथे आयोजित महोत्सवाच्या माध्यमातून खाद्य संस्कृती, वेशभूषा, संगीत कला, नृत्य व आगरी संस्कृतीची ओळख मांडण्यात येत आहे.या महोत्सवात आगरी बांधव आपल्या विविध कलांचे सादरीकरण करणार आहे. यातून आगरी समाज बधावांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी हा महोत्सव अतिशय उपयुक्त ठरणार असून पर्यटनाला चालना मिळून अर्थकारणाला गती मिळणार आहे. त्यामुळे यापुढील काळातही नियमित या महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले.