PM आवास योजनेचे पैसे खात्यावर येताच ४ महिला प्रियकरांसोबत पळाल्या

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


उत्तर प्रदेशच्या बाराबंकी इथं पंतप्रधान आवास योजनेतंर्गत ४ महिलांना योजनेचा पहिला हफ्ता म्हणून ५० हजार रुपये मिळाले. महिलांच्या खात्यात ५० हजार जमा होताच या चार महिला पतीला सोडून प्रियकरांसोबत पसार झाल्यानं गावात खळबळ माजली.

संबंधित प्रकाराबाबत पीडित पतीने अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तेव्हा तेदेखील हैराण झाले. जिल्हा नगरविकास अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

योजनेचा पहिला हफ्ता मिळाल्यानंतर बांधकाम न झालेल्या ४० लाभार्थ्यांना नोटीस जारी करण्यात आले. त्यानंतर महिलांच्या पतीने या प्रकाराचा खुलासा केला. त्याचसोबत योजनेचा दुसरा हफ्ता रोखावा अशी मागणीही त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता हफ्ता पाठवू नका असं ४ महिलांच्या पतीने पत्रात मागणी केलीय. कारण त्यांच्या पत्नी पहिला हफ्ता मिळताच प्रियकरासोबत पसार झाल्यात.

पंतप्रधान आवास योजनेतंर्गत पक्के घर बांधण्यासाठी सरकारकडून पैसे दिले जातात. त्यात पहिला हफ्ता ५० हजार रुपये दिला जातो. नगर विभागाने सिद्धौर, रामनगर, बेलहराच्या ४ महिलांच्या खात्यात योजनेचा पहिला हफ्ता म्हणून ५० हजार रुपये पाठवले. सरकारनं पैसे पाठवल्यानंतर विभागाने सर्वांना नोटीस पाठवून तात्काळ बांधकाम सुरू करा असा आदेश दिला होता. परंतु जेव्हा नोटीस मिळाली तेव्हा पसार झालेल्या महिलांच्या पतीने विभागाला हा प्रकार कळवला. त्यामुळे या महिलांकडून पैसे वसूल कसे करायचे याची चिंता अधिकाऱ्यांना लागली आहे.

अनेक लाभार्थ्यांनी पैसे घेऊनही घरं बांधली नाहीत
या प्रकरणातील विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पंतप्रधान आवास योजनेचे जिल्हा समन्वयक शिवम विश्वकर्मा म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेसाठी १६ हजार लाभार्थ्यांना पहिला हफ्ता देण्यात आला आहे. त्यातील ४० जणांनी पैसे मिळूनही बांधकाम सुरू केले नाही. जेव्हा तपासणी केली तेव्हा ४ अशी प्रकरणे मिळाली ज्यात पैसे घेऊन पसार झाले आहेत. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.