जीव वाचला पण अब्रूवर घाला

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे प्राण वाचले मात्र तिला अतिप्रसंगाला सामोरे जावे लागल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. केरळमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असताना रुग्णवाहिकेत वॉर्डबॉयने तिच्यावर बलात्कार केला. महिलेला त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात येत असताना ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोडुंगल्लूर रुग्णालयातील कर्मचाऱ्याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्रिशूल मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केल्यानंतर या पीडितेने डॉक्टरांना घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत आरोपीला अटक केली.

महिलेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र नातेवाईकांच्या लक्षात येताच तिला तातडीने कोडुंगल्लूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात तिच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने महिलेला त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.

कोडुंगल्लूर रुग्णालयातून वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरित होत असताना रुग्णालयातील कर्मचारी दयालाल यांना रुग्णवाहिकेत सोबत येण्यास सांगण्यात आले. दरम्यान, दयालालने रुग्णवाहिकेत महिलेवर बलात्कार केला. पीडितेने सुरुवातीला नर्सला हा प्रकार सांगितला आणि नंतर डॉक्टरांनाही माहिती दिली. यानंतर रुग्णालयातच पोलिसांना पाचारण करण्यात आले.

हे घृणास्पद कृत्य करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. अटकेसोबतच आरोपी दयालालला तत्काळ प्रभावाने नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. तो कंत्राटी तत्वावर काम करत होता.