जपानमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी होत असून या हिम वर्षावात आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 93 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जपानमध्ये सहसा बर्फवृष्टीदरम्यान बर्फ जमा होत नाही.
मात्र यंदा घरांवर आणि रस्त्यांवर 2 फुटांपर्यंत बर्फ साचला आहे. त्यामुळे अनेक वाहने अडकून पडली. सुमारे 20 हजार घरांची वीजही निकामी झाली आहे.
जपान आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 24 डिसेंबरपर्यंत एका आठवड्यात झालेल्या हिमवर्षावात 11 जणांचा मृत्यू झाला होता, परंतु ख्रिसमसच्या दिवशी हिमवर्षाव तीव्र झाला आणि 7 जणांना आपला जीव गमवावा लागला. आतापर्यंत एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील अनेक लोकांचा मृत्यू बर्फ साफ करताना छतावरून खाली पडून झाला आहे.
नागई शहरात घराच्या छतावर साचलेला बर्फ अंगावर पडल्याने एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. होक्काइडो शहरात बर्फ साफ करत असलेल्या दोन ट्रॅकमध्ये अडकल्याने एका 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. काशीवाझाकी शहरात बर्फ साफ करताना एका 85 वर्षीय व्यक्तीचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला.
ईशान्य जपानमध्ये सध्या सरासरीपेक्षा तिप्पट बर्फवृष्टी होत आहे. टोकियोत येणारी आणि येथून जाणारी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. रेल्वे रुळांवर बर्फ साचला आहे. त्यामुळे अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. गोठलेल्या बर्फामुळे रस्त्यांवर 20 किमीपर्यंत ट्रॅफिक जाम दिसत आहे.
जपानच्या यामागाता प्रीफेक्चरच्या अनेक भागात 229 सेमी बर्फवृष्टी झाली. आओमोरी येथे 193 सेमी, निगाता 170 सेमी, होक्काइडो 154 सेमी आणि फुकुशिमा 148 सेमी बर्फवृष्टी झाली. जपानमधील हवामान अधिकाऱ्यांनी लोकांना बर्फ साफ करताना सावधगिरी बाळगण्याचे आणि एकट्याने काम न करण्याचे आवाहन केले आहे.