फायनान्सच्या हप्तेवसुलीच्या वादातून तरुणावर गोळीबार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


फायनान्सच्या हप्तेवसुलीच्या वादातून तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना नगर-पुणे महामार्गावरील श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी दोनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते फरार आहेत.
हल्लेखोरांचा नेम चुकल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

अक्षय अर्जुन औटी (वय 28, रा. सरदवाडी, ता. शिरूर) असे हल्ला झालेल्याचे नाव आहे. संकेत संतोष महामुनी (रा. बाबुरावनगर, शिरूर) आणि संकेत सुरवसे (रा. सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय औटी याने टाटा फायनान्स कंपनीकडून कार घेतली आहे. तर, संकेत महामुनी हा टाटा फायनान्स कंपनीत कर्जवसुलीचे काम करतो. अक्षयच्या गाडीचे हप्ते थकले होते. यावरून महामुनी आणि सुरवसे यांनी अक्षयसोबत भांडण केले होते. शुक्रवारी (दि. 2) रात्री अक्षय हा मित्राचा वाढदिवस करून गाडीतून घरी जात होता. श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी शिवारात आरोपींनी पिस्तुलाच्या धाकाने अक्षयला गाडी थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर समोरच्या बाजूने त्याच्यावर गोळीबार केला. मात्र, हल्लेखोरांचा नेम चुकल्याने अक्षयने तेथून पळ काढला. तरीही आरोपींनी आणखी दोन राउंड फायर केले. या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून, बेलवंडी पोलिसांत आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय बोत्रे तपास करीत आहेत.