अभ्यास न करता आई रागावली मित्राला सोबत घेत थेट पुणे गाठले
औरंगाबाद : दहावीच्या वर्गात असतानाही अभ्यास न करता उनाड मुलांबरोबर फिरत असल्यामुळे १५ वर्षीय मुलाला आई रागावली. रागाच्या भरात दोन थोबाडीतही दिल्या. त्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलाने शेजारच्या १३ वर्षीय मित्राला सोबत घेत थेट पुणे गाठले. पुण्यात फिरून हे दोघे दुसऱ्या दिवशी पुन्हा शहरात परतले. तोपर्यंत मुलाच्या आईने दोन मुलांच्या अपहरणाचा गुन्हा सिडको पोलिस ठाण्यात नोंदवला होता.
सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय रणजित (नाव बदललेले आहे) हा दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याचा १३ वर्षीय मित्र अभिजित (नाव बदलेले आहे) हा आठवीच्या वर्गात आहे. दोघांचे घर एकाच भागात आहे. रणजितची आई धुणीभांडी करते. वडील पेंटर आहेत. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी रणजितला आई रागावली. सतत चिडचिड करणे, उनाड मुलांसोबत फिरत असल्यामुळे आईने त्याला दोन चापटीही लगावल्या. याचा राग आल्यामुळे रणजित अभिजितला घेऊन गायब झाला.
तो दिवसभर घरी न आल्यामुळे सायंकाळी आईने वडिलांना ही बाब सांगितली. त्याचवेळी शेजारचा अभिजितही गायब असल्याचे समोर आले. दोघांचा शोध कुटुंबांनी घेतला, मात्र सापडले नाहीत. त्यामुळे २६ नोव्हेंबर रोजी दुपारी रणजितच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला. निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक बुधा शिंदे हे तपास करीत असताना २६ नोव्हेंबर रोजी ही मुले रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आली. पालकांनीच त्यांना शोधले आणि पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली.