आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरातत्व खजिना

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


एक शेतकरी रोप लावण्यासाठी जमीन खणत असताना त्याची कुदळ कशावर तरी जोरदार आपटली. त्यानंतर त्याने आपल्या मुलाला बोलावलं आणि त्या दोघांनी तीन महिन्यापर्यंत त्या ठिकाणी उत्खनन केलं.
या उत्खननानंतर त्यांना एक अनमोल असा खजिना मिळाला. त्या भागात सापडलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरातत्व खजिना असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

हे प्रकरण गाझा येथील आहे. जिथे एका पॅलेस्टिनी शेतकऱ्याला बायझंटाईन काळातील एक अलंकृत मोझॅक (Mosaic) सापडलं आहे. या शोधामुळे पुरातत्व विभागातील लोक अत्यंत उत्साही झाले आहेत.

ज्या भागात हे मोझॅक सापडले आहे, तिथे इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात नेहमीच संघर्षाचा धोका असतो. त्यामुळे या पुरातत्व खजिन्याच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

गाझाच्या ज्या भागात हे मोझॅक सापडले आहे, ते इस्त्रायली सीमेपासून फक्त १ किलोमीटर अंतरावर आहे. मोझॅकच्या मजल्यावर पशू आणि पक्ष्यांच्या १७ प्रतिमा आहेत. विशेष म्हणजे हा मोझॅक अजूनही चांगल्या स्थितीत आहे.

एबीसी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, पुरातत्वशास्त्रज्ञ रेने अल्टर यांनी सांगितले की हे मोझॅक ५ व्या ते ७ व्या शतकातील आहे. ही रचना कधी बांधली गेली? त्याच्या अचूक माहितीसाठी, ती जागा योग्यरित्या खोदणे आवश्यक आहे.

प्राचीन काळी, गाझा पट्टी हा इजिप्त आणि लेव्हंटमधील व्यापाराचा एक अतिशय महत्त्वाचा मार्ग होता. हे क्षेत्र कांस्ययुगापासून इस्लामिक आणि ओट्टोमन कालखंडापर्यंतच्या जुन्या संस्कृतींच्या अवशेषांनी भरलेले आहे. पण, काळाच्या ओघात त्या नष्ट होत आहेत.

ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर ही मोझॅक फरशी सापडली आहे त्याने हा अनमोल खजिना टिनपत्र्यांनी झाकून ठेवला आहे. या अनोख्या शोधाचे संरक्षण करण्यासाठी सरकारकडून नुकसानभरपाईची अपेक्षा असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.