पैशांचा पाऊस पाडण्यासाठी नरबळी,भोंदू बाबाची तयारी पुढे काय ?

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मुरबाड : तालुक्यातील 2009 च्या नरबळीची पुनरावृत्तीचा प्रकार फसला. तालुक्यातील सोनावळे गावात काल रात्री बंधू वाघ व काजी दाऊद शेख यांनी आपल्या भावाच्या बंद घरात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी काल नरबळी देण्यासाठी जमवाजमव केली होती.
परंतू ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उधळून लाऊन त्यांना टोकावडे पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.

मुरबाड तालुक्यात 2009 साली सोनगावातील बंधू तुकाराम वाघ व काजी दाऊद शेख यांनी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी एका मुलीचा बळी दिला होता. त्यावेळी या काजीने त्या मुलीची नखे होमात टाकण्यासाठी बोटे सुद्धा कापली होती. त्या प्रकरणात अत्यंत क्रूरपणे वागणाऱ्या या दोघांना काही वर्ष जेलची हवा खावी लागली होती. त्याच दोघांनी जेलमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा तेच जीवघेणे अघोरी उद्योग सुरू केले आहेत. काल अमावस्या असल्याने बंधू तुकाराम वाघ, काजी दाऊद शेख यांनी रशीद दाऊद शेख या भावाच्या बंद घरात नरबळी देऊन पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अगरबत्ती, लिंबू, मिरच्या, काळ्या बाहुल्या, गंडे दोरे, हळद, कुंकू, नारळ, अंतरपाट, बाशिंगे, अशा साहित्याची जमवा जमव केली होती. त्यासाठी त्यांच्यासोबत बंधू वाघचा मुलगा विजय वाघ, साईनाथ कदम (रा. कदमपाडा), गणेश देशमुख (रा. जडई), दत्तात्रय भोईर (रा. जडई), गणेश शेलार (रा. तिवारपाडा) त्याचबरोबर त्यांच्यासोबत पुणे जिल्ह्यातील सुनीता वाघ, (वय 26), साक्षी शेळके (वय 19, रा. बोरघर, आंबेगाव) या दोन मुलीही होत्या.
या सर्वांनी सोनावळे गावातील काजी शेख यांच्या रशीद शेख या भावाच्या बंद घराला बाहेरून कुलूप लावून मागच्या दरवाजातून प्रवेश करून आतून कडी लावून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी घरात सर्व मांडणी करून धुपाचा धूर केला. यावेळी काही वेळेनंतर नाशिकहून कोणीतरी बाबा नरबळी घेऊन येणार होते अशी माहिती ग्रामस्थांना मिळाली. घरात झालेला धुपाचा धूर बाहेर आल्यानंतर काही ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच हा नरबळी जाऊ नये म्हणून त्यांनी पोलीस पाटील यांना सांगून घराचा कुलूप तोडून त्यांची धरपकड करून त्यांची अघोरी पूजा साहित्य उध्वस्त केले. त्यांना त्याच घरात कोंडून टोकावडे पोलिसांना बोलावून संजय लक्ष्मण भोईर, बाळू हरी भोईर व ग्रामस्थ यांनी तक्रार करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

टोकावडे पोलिसांनी गु.र.क्र. 157/2022 भा. दं. सं. कलम 34, सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3(2), 3(3) प्रमाणे दाखल गुन्ह्याची नोंद केली आहे.
अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा अशा प्रकारची कृती व त्यासाठी सहकार्य करण्यासाठी एकत्र जमले असल्याने त्यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास संतोष दराडे, सहा. पोलीस निरीक्षक टोकावडे पोलीस स्टेशन हे करित आहेत. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले आहे.