बाथरूममध्ये तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ, पाईप डक्टवर चढून बाथरूममध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबईमध्येही एका विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडीओ बनवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

विद्यार्थिनीचा आरोप आहे की, रविवारी रात्री कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने वसतिगृह 10 (H10) च्या बाथरूममध्ये तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पिंटू गरिया असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीच्या मोबाईलमधून अद्याप कोणताही व्हिडीओ सापडलेला नाही.

हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याच दरम्यान आयआयटी मुंबईने एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, आयआयटीच्या वसतिगृहातील नाईट कॅंटीनमध्ये काम करणारा कर्मचारी पाईप डक्टवर चढून बाथरूममध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता. सध्या त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीकडे असलेल्या फोनमध्ये कोणते फुटेज आहे, याबाबत आम्हाला अद्याप काहीही माहिती नाही. कँटीनला तात्काळ बंद करण्यात आले असून केवळ महिला कर्मचारी असताना ही सुरु राहणार आहे.

आयआयटी मुंबईने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आरोपीने ज्या पाईपचा वापर केला, तो परिसर सध्या ब्लॉक करण्यात आला आहे. आयआयटी मुंबई आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जे आवश्यक आहे, ते सर्व आम्ही करू. आयआयटी मुंबईचे डीन प्रोफेसर तपनेंदू कुंडू म्हणाले की, वसतिगृहाचे कँटीन पूर्वी पुरुष कर्मचारी चालवत होते. संस्थेने या प्रकरणावर त्वरित कारवाई केली आहे. आयआयटी मुंबईमधील बाथरूमकडे जाणारा रस्ता सील करण्यात आला आहे. वसतिगृह विभाग H10 चा तपास केल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे.