व्याजाने दिलेले दहा लाख परत देण्यास उशीर झाल्याने व्याजावर व्याज आकारणी करून पैसे वाढविले. तसेच, संबंधीत व्यक्तीचा फ्लॅट व शॉप तारण म्हणून घेतला. यानंतर संबंधीत फ्लॅट व शॉप सोडविण्यासाठी 33 लाखांच्या खंडणीची मागणी करून हे पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पिसोळी गावच्या माजी सरपंचासह अन्य एकावर खंडणी विरोधी पथक दोनकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनाथ ज्ञानोबा मासाळ (रा. पिसोळी), उमेश श्रीहरी मांगडे (रा. मांगडेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मासाळ हे पिसोळी गावचे माजी सरपंच आहेत. तर, उमेश मांगडे हे मांगडेवाडी गावच्या माजी सरपंचाचे मुलगा आहेत. त्यांचा हॉटेल व बिल्डींग कन्स्ट्रंक्शनचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत 34 वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. हा प्रकार जानेवारी 2020 पासून सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार यांचा जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना पैशाची गरज भासल्याने त्यांनी जानेवारी 2020 मध्ये मासाळ यांच्याकडे पैसे मागितले होते. त्यावर मासाळ यांनी तक्रारदाराला मांगडे यांच्या कात्रज येथील हॉटेलवर नेले. याठिकाणी मासाळ यांनी मांगडेंकडून दहा लाख रुपये 5 टक्के प्रतिमहीना व्याजदराने घेवून तक्रारदारांना दिले. यावेळी तक्रारदाराची महागडी मर्सिडीज कार मांगडे यांच्याकडे गहाण ठेवण्यात आली. त्यानंतर तक्रारदारांनी वेळोवेळी व्याजाचे चार लाख दहा हजार रुपये परत केले. मात्र, काही महिने व्याज परत न केल्याने आरोपींनी व्याजावर व्याज आकारणी करण्यास सुरवात केली.
मासाळ आणि मांगडे या दोघांनी संगनमत करून तक्रारदाराकडून एक प्लॅट व एक शॉप तारण ठेवून घेत ते सोडविण्यासाठी 33 लाखांच्या खंडणीची मागणी केली. तक्रारदार पैसे देत नसल्यामुळे त्यांच्या घरात घुसून दोघांनी ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत अखेर तक्रारदाराने खंडणी विरोधी पथक दोनकडे अर्ज केला होता. आलेल्या अर्जाची चौकशी करून पथकाने मासाळ आणि मांगडे यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव पुढील तपास करीत आहेत.