उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का, राज्यातील शिवसेनेच्यापदाधिकाऱ्यांचा शिंदे गटाला पाठिंबा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


महाराष्ट्रातील नेत्यांपाठोपाठ आता इतर राज्यातील शिवसेनेच्यापदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा याचा निर्णय निवडणूक आयोगासमोर होणार आहे.
निवडणूक आयोगासमोर सुरू होणाऱ्या संघर्षा आधीच उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांपाठोपाठ आता इतर राज्यातील शिवसेनेच्यापदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

मंगळवारी शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राबाहेरील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. यामध्ये जवळपास 8 राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मणिपूर, गोवा, बिहार आदी राज्यांचे प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये शिवसेना मागील काही वर्षांपासून पक्ष विस्तारासाठी प्रयत्नशील आहे.

निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्हं धनुष्यबाण आपल्याला द्यावे अशी मागणीदेखील एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर, दुसरीकडे सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने सुनावणी न घेण्याची मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई करावी यासह इतर मुद्यांवर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाने सुप्रीम कोर्टासमोर निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. यावर सुप्रीम कोर्टात 29 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.