राज्यातील लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आता बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी भाग समजल्या जाणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातही लहान मुलांचं अपहरण करणारी टोळी सक्रिय झाली आहे.
बुलडाण्यातून नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात एका शाळकरी विद्यार्थीनीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
चारचाकी वाहनातून आलेली एक महिला आणि दोन पुरुष शाळेतून घरी जात असलेल्या या चिमुकलीला गाडीत ओढून अपहरण करायचा प्रयत्न करत होते. यावेळी या चिमुकलीने प्रसंगावधान राखून गाडीत ओढत असलेल्या महिलेच्या हाताला चावा घेतला आणि स्वतःची सुटका करून घेतली.
तिने दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आणि तिच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. मुलीच्या आजोबांनी तामगाव पोलिसांत या संपूर्ण प्रकाराबाबत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून तामगाव पोलिसांनी अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अनोळखी महिलेसह दोन पुरुषांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, संग्रामपूर तालुक्यातील पालकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
शाळकरी मुलीचं अपहरण करण्याचा अशाप्रकारे झालेला प्रयत्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे, आपल्या मुलांना शाळेत पाठवायचं की नाही? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर या अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याचं मोठं आव्हान आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही.