आमिर खानच्या घरावर धाड अठरा कोटींची बेहिशेबी रक्कम जप्त

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


ईडीने आमिर खानच्या घरावर धाड टाकली आणि अठरा कोटींची बेहिशेबी रोख रक्कम जप्त केली.

या अठरा कोटींपैकी सात कोटींची रोख रक्कम घरातील एका पलंगाखाली लपवून ठेवली होती. तीन यंत्रांच्या मदतीने सकाळी साडेआठपासून संध्याकाळी उशिरापर्यंत ईडीचे अधिकारी नोटांची मोजदाद करत होते. जप्त केलेल्या नोटांमध्ये प्रामुख्याने पाचशे आणि दोन हजाराच्या नोटांची अनेक बंडले होती. जप्त केलेली रक्कम माझी नाही, असा दावा आमिर खानने केला. पण त्याची नसलेली रक्कम त्याच्या घरात कशी या ईडीच्या प्रश्नावर आमिर खानने उत्तर दिले नाही.

ठोस माहिती मिळाल्यानंतर ईडीने ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आमिर खानच्या घरावर धाड टाकली. आमिरचे घर पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामधील गार्डनरीच परिसरात आहे. याच घरावर ईडीने धाड टाकली. घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. या रकमेविषयी आमिर ईडीला समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकला नाही. याच कारणामुळे ईडीने घरात सापडलेली बेहिशेबी रक्कम जप्त केली.

आमिरच्या घरात सापडलेली रक्कम हवाला रॅकेटशी संबंधित आहे, असा संशय ईडीला आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे. एका गेमिंग अॅपच्या मदतीने अनेकांना लुबाडल्याप्रकरणी तपास सुरू आहे. या तपासाचा भाग म्हणून मागील काही दिवसांपासून ईडीची पथके पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी धाडी टाकत आहेत. या धाडींमधून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आमिर खान विरोधात झालेली कारवाई ही गेमिंग अॅपच्या माध्यमातून झालेल्या घोटाळ्याशी संबंधित आहे. आमिर खानच्या इतर मालमत्तांवरही ईडीची धाड पडली आहे, त्याच्या संपत्तीची कसून चौकशी सुरू आहे.

ईडीने गेमिंग अॅप फसवणूक प्रकरणात कोलकातामध्ये न्यूटाउन, पार्क स्ट्रीट, मोमिनपुरमधील पोर्ट एरिया आणि गार्डनरीच या सर्व ठिकाणी मागील काही दिवसांपासून धाड सत्र सुरू केले आहे. आमिरच्या शाही अस्तबल लेन येथील दुमजली घरातील मालमत्तेची ईडीने तपासणी सुरू केली आहे. पार्क स्ट्रीट पोलीस ठाण्यात आमिर खान विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तपासातून हाती येणाऱ्या माहितीआधारे आमिर विरोधात आणखी कठोर कायदेशीर कारवाई होण्याची चिन्हं आहेत.