पाकिस्तानमधील गरीबांच्या संख्येत १.२ कोटींची वाढ
पाकिस्तानला पुराचा तडाखा बसल्यामुळे देशातील १० ते २० लाख जणांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. यातील अनेकांना पुन्हा गमावलेली नोकरी मिळविण्याची आशा उरलेली नाही. पाकिस्तानमधील कृषी क्षेत्रात जवळपास ७८ टक्के महिला कार्यरत होत्या. पण लाखो एकर शेती वाहून गेल्यामुळे आणि शेतीसाठी अयोग्य झाल्यामुळे महिला करत असलेले कृषी क्षेत्रातील काम बंद झाले आहे.
महापुरामुळे पाकिस्तानचे किमान २० अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचा सुधारित अंदाज आहे. पुरामुळे पाकिस्तानमधील गरीबांच्या संख्येत १.२ कोटींची वाढ झाली आहे.
पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने ही नवी आकडेवारी जाहीर केली आहे.
पुराचा जबर तडाखा बसलेल्या पाकिस्तानला बड्या देशांकडून तसेच आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून मोठ्या मदतीची आशा आहे. ही मदत मिळाली तरच देशाला लवकर सावरणे शक्य होईल. नाहीतर परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती पाकिस्तान सरकारने व्यक्त केली आहे. अनेकांची घरे वाहून गेली किंवा आता राहण्यायोग्य स्थितीत नाही. निवासी व्यवस्थेशी संबंधित किमान ६ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त पशुधनाचे ४ अब्ज डॉलरचे नुसान झाले आहे, असा अंदाज पाकिस्तानच्या अर्थ खात्याने व्यक्त केला आहे.
पुराचा तडाखा बसल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात देशाचे ४ ते ५ अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने व्यक्त केला आहे. आणखी माहिती मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारातील देशाच्या हानीचा अंदाज बदलू शकतो असे पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने सांगितले.
पाकिस्तानला पुराचा तडाखा बसल्यामुळे देशातील १० ते २० लाख जणांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. यातील अनेकांना पुन्हा गमावलेली नोकरी मिळविण्याची आशा उरलेली नाही. पाकिस्तानमधील कृषी क्षेत्रात जवळपास ७८ टक्के महिला कार्यरत होत्या. पण लाखो एकर शेती वाहून गेल्यामुळे आणि शेतीसाठी अयोग्य झाल्यामुळे महिला करत असलेले कृषी क्षेत्रातील काम बंद झाले आहे. याचा परिणाम धान्योत्पादनवार होईल. देशाच्या क्रय शक्तीत मोठी घट होईल, असाही अंदाज पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने व्यक्त केला आहे.